कसारा : नाशिक येथील दलित-सवर्ण वादाचे पडसाद कसाऱ्यात उमटल्याचा फायदा घेऊन एका अज्ञाताने सोमवारी रात्री ११.४५च्या सुमारास मुंबईहून कसाऱ्यासाठी आलेल्या व सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलच्या प्रथम दर्जाच्या डब्याला आग लावून पोबारा केला.त्र्यंबकेश्वर - (नाशिक) तळेगाव येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मराठा विरुद्ध दलित असा उद्रेक झाला होता. ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात येत होती. महामार्ग बंद ठेवण्यात आले होते. याचे पडसाद कसाऱ्यापर्यंत पोहोचले होते. सोमवारी आरपीआयने कसारा बंदचे आवाहन केले होते. यामुळे शहापूर उपविभागीय अधिकारी विशाल ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे (कसारा पोलीस स्टेशन) शहापूर, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय धुमाळ, वासिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्यात दलित व मराठा समाजाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेऊन कसाऱ्यात शांतता राखावी, असे आवाहन केले. बैठक संपल्यानंतर कसाऱ्यात रात्री ११.४५ वा. सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्याला अज्ञात समाजकंटकाने आग लावून कसाऱ्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. डब्याला लागलेल्या आगीमुळे प्रथम वर्गाचा डबा पूर्णत: जळून खाक झाला. परिणामी, या घटनेमुळे कसाऱ्यात उलटसुलट चर्चेला व अफवांना पेव फुटले होते. प्रथम वर्गाच्या डब्याला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक सफाई कर्मचारी, पोलीस व ग्रामस्थांनी आग तत्काळ विझवली. (प्रतिनिधी)
कसाऱ्यात लोकलचा एक डबा जाळला
By admin | Published: October 12, 2016 6:40 AM