लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकात मंगळवारी सिग्नल यंत्रणेच्या केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. लोकल सुमारे ४० ते ५० मिनिटे उशिराने धावत होत्या. अनेक ठिकाणी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी वाहतूक पूर्ववत झाली.
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ९० लोकल रद्द करण्यात आल्या, तर २२० लोकलला लेटमार्क लागला. मालाड स्थानकातील सिग्नल यंत्रणेच्या केबलमध्ये बुधवारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. यामुळे सिग्नल यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. सिग्नल यंत्रणा नादुरुस्त झाल्याने चर्चगेट ते विरार दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. लोकलला सिग्नलच मिळत नसल्याने लोकल जागीच उभ्या होत्या. यामुळे लोकलच्या रांगा लागल्या होत्या. गाड्या पुढे जात नसल्याने प्रवासी अडकून पडले. उन्हाच्या कडाक्यात लोकलची वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागला.
धिम्या आणि जलद मार्गावरही गोंधळ- डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक सुरू ठेवली असली तरी सिग्नल यंत्रणेच्या बिघाडामुळे अप-डाऊन धिमी आणि जलद अशा चारही मार्गांवरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती.
अनेकांनी चालत जाऊन गाठले जवळचे बसस्थानक- सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत होते. परंतु, सुरुवातीला बराच वेळ नेमका बिघाड काय झाला आहे, हे कळत नव्हते. त्यातच माहिती मिळत नसल्याने प्रवासी त्रासले होते. लोकलमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांनी खाली उतरून रुळांमधून चालत जाऊन जवळचे बसस्थानक गाठले.
एसी लोकललाही फटका- दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास डाऊन मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात रेल्वेला यश आले. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता सर्व मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर आली. परंतु, गाड्यांचे बंचिंग झाल्याने वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. त्याचा फटका एसी लोकललादेखील बसला.
१३ दिवसांत ५ वेळा सिग्नलमध्ये बिघाड
- पश्चिम रेल्वेमार्गावर १ ते १३ जून या १३ दिवसांत तब्बल पाच वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे दर रविवारी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमध्ये नेमकी कशाची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते? असा प्रश्न प्रवाशांनी केला आहे.
- मंगळवारी झालेल्या सिग्नल यंत्रणेतील बिघाडानंतर पश्चिम रेल्वेने सुमारे ५०० मीटर अंतरावरील एकूण ८ केबल बदलल्या. याकरिता रेल्वेचे ४० अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते.