मुंबई : वडाळा ते जीपीओ या मार्गाला वडाळा पूर्वेकडील काही भागातून विरोध करण्यात आला आहे. हा मेट्रो मार्ग बरकत अली दर्गा मार्गावरून न नेता पूर्व द्रुतगती महामार्गावरून न्यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह वडाळा मर्चंट वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.वडाळा-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ च्या विस्ताराबाबत चाचपणी केल्यानंतरच विस्ताराचे काम पुढे नेण्यात येणार आहे. त्यामुळे वडाळा-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ प्रकल्पाचा विस्तार सीएसएमटी स्थानकाशेजारील जनरल पोस्ट आॅफिसपर्यंत (जीपीओ) करण्याची योजना आहे.या प्रकल्पाच्या विस्तार होऊ घातलेला भाग असलेल्या वडाळा बरकत अली दर्गा मार्गावरील दुकानांचे तसेच झोपडीधारकांचे सर्वेक्षण अचानक सुरू झाल्याने मेट्रो रेल्वे प्रकल्प अन्य मार्गावरून हलवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिकांच्या मागणीमुळे मेट्रोच्या विस्ताराच्या कामाला ब्रेक लागण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसत आहेत. त्यानुसार बुधवारी वडाळा पोलीस ठाण्यासमोर प्रकल्पबाधितांनी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांची भेट घेऊन अशी मागणी करण्यात आली.वडाळा भक्ती पार्क येथून वळसा घालत बरकत अली दर्गा मार्गालगत असलेल्या वस्तीतून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जीपीओपर्यंत मेट्रो रेल्वेचा विस्तार होणार आहे. त्यामुळे १०० हून अधिक दुकाने व १५० हून अधिक घरांवर मेट्रोची कुºहाड कोसळणार आहे. रहिवाशांनी एमएमआरडीए प्रशासनाला मेट्रो वस्तीतून मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल मार्गे वळसा न घालता सरळ गणेशनगर या ठिकाणाहून स्वस्तिक या मार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनस या सरळ मार्गाची निवड करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे एमएमआरडीएला करण्यात आली आहे.
मेट्रो प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 12:53 AM