मुंबई- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका व नगरपंचायत निवडणूकांमध्ये पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय झाला असून याची सुरुवात दसर्यानंतर करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आज राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. त्यानंतर या बैठकीतील निर्णयाबाबत नवाब मलिक यांनी माध्यमांना माहिती दिली.
आगामी तीन - चार महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांची जबाबदारी मंत्र्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्यावतीने शिबीरे, मेळावे व इतर तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीतील आघाडीचे निर्णय स्थानिक पातळीवर राहणार असून याबाबतची माहिती पालकमंत्री, संपर्कमंत्री आढावा घेऊन पवारसाहेबांकडे देणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यात लखीमपूर खिरी प्रकरणात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बंद पुकारला होता. यामध्ये व्यापारी, कामगार संघटना व जनतेने सहभाग नोंदवला त्याबद्दल राष्ट्रवादीच्यावतीने आभार मानण्यात आले.
आगामी सणासुदीमध्ये दुकाने, हॉटेल यांच्यावरील कोरोना काळातील बंधने कमी करावीत, शिथिल करावीत असा निर्णय पक्षाच्यावतीने घेण्यात आला असून हा निर्णय मुख्यमंत्र्यांना भेटून सादर करण्यात येणार आहे. याशिवाय राजकीय परिस्थितीचा व ज्या पोटनिवडणूका झाल्या त्या प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. पूर्वीपेक्षा भाजपाच्या ७ जागा या निवडणुकीत कमी झाल्या असून राष्ट्रवादीच्या जागा वाढल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.