अखेर ११ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर लोकल सेवा सुरू; पहिल्याच दिवशी प्रवाशांची तुरळक गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 10:36 AM2021-02-01T10:36:27+5:302021-02-01T10:39:00+5:30
पहाटेच्या वेळी वसई-नालासोपारा व विरार स्थानकामध्ये प्रवाशांची तुरळक गर्दी तर, तिकीट खिडक्या मोजक्या असल्याने तिकिटासाठी झाली गर्दी !
आशिष राणे
वसई: विरार- चर्चगेट ही मुंबई उपनगरीय लोकल सेवा अखेर आज ११ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा सुरू झाली आहे. कोरोना संक्रमण नियंत्रणात आल्यानंतर सोमवार (दि.१ फेब्रु) पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. आज पहाटे विरार रेल्वे स्थानकावरून पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पहिली विरार -चर्चगेट लोकल सेवा थोड्या फार तुरळक प्रवाशांच्या हजेरीत सुरू होताच उत्साहीत होत प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.
दरम्यान राज्य सरकारने उशिरा का होईना प्रवाशांच्या आरोग्याची काळजी व दक्षता घेत तब्बल ११ महिन्यानंतर लोकल सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. अर्थातच लोकल सेवा व नियोजित वेळेसाठी दिलेली परवानगी यात अंतर असलं तरीही नोकरी धंद्यानिमित्त तसेच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत मुंबई लोकल आजपासून दाखल झाली आहे. कोरोना संसर्गामुळे मागील ११ महिने ही लोकल सेवा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे सर्वसामान्य वसईकर स्टेशनकडे फिरकले देखील नव्हते.
मात्र आज दि.१ फेब्रुवारी पासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पहाटे पासूनच तिकीट खिडकीवर प्रवाशांची लगबल पाहायला मिळाली तर वसई नालासोपारा आणि विरार रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडक्या मोजक्याच उघडल्याने थोड्या फार रांगा तिकिटासाठी लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. अगदी अर्ध्या तासाहून अधिक वेळ सर्वसामान्य प्रवाशांना चक्क रांगेत उभं रहावं लागलं.
लोकल सेवा सुरू मात्र वेळेचे बंधन
पहाटे ३.४० मि. या पहिल्या लोकल ट्रेनपासून फक्त सकाळी ७ वाजेपर्यंतच लोकलमध्ये प्रवेश मिळणार आहे. तर त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रत्येक रेल्वेस्थानकावर तिकीट खिडक्या वाढवणे गरजेचे होते पण त्या वाढवल्या नसल्याने तिकिटासाठी प्रवाशांना लांबच लांब रांगा लावून सुद्धा वेळेत तिकीट मिळत नसल्याचं चित्र देखील रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळालं.
रेल्वे प्रशासन ढिम्म ! भोंगळ कारभार
ज्या प्रवाशांना रांगा लावूनही वेळेत तिकीट मिळालं नाही त्या प्रवाशांनी मात्र रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे. एकतर प्रवास करायला वेळेची अट व दुसरीकडे प्रशासनाचा भोंगळ कारभार यामुळे पहिल्या दिवसाच्या लोकल प्रवासावर एकप्रकारे विरजण पडल्याचे पाहायला मिळालं. रेल्वेनं सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळेचं बंधन घातलं आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ ही वेळ सोडून उर्वरित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. दिलेल्या वेळेशिवाय कुणी सर्वसामान्य नागरिक लोकल प्रवास करताना आढळून आला तर त्याला २०० रुपये दंड व एक महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांना विशिष्ट वेळेतच प्रवास करावा लागणार आहे. रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी वेळेपूर्वी सामान्यांना तिकीट देण्यात येईल, अशी भूमिका रेल्वे प्रशासनानं घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी लोकल प्रवास करताना वेळेची मर्यादा पाळणं अत्यंत गरजेचं बनलं आहे.
कधी प्रवास करता येईल…?
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.
कधी प्रवास करता येणार नाही…?
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत रेल्वे प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.