ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत; अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 10:39 AM2023-10-05T10:39:25+5:302023-10-05T10:40:28+5:30
केवळ ठाणे ते बेलापूर पर्यंतच ट्रान्स हार्बर लोकल धावणार आहे. त्यामुळे अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
मुंबई : हार्बर मार्गावर (Trans Hurbour Line) रेल्वेचा घोळ सुरुच आहे. आता ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून हार्बर मार्गावर सुरू असलेला गोंधळ आजही पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज बेलापूर ते पनवेल ट्रान्स हार्बर लोकल धावणार नसल्याची स्थानकात उद्घोषणा करण्यात आली आहे. केवळ ठाणे ते बेलापूर पर्यंतच ट्रान्स हार्बर लोकल धावणार आहे. त्यामुळे अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे ते पनवेल लोकलसेवा फक्त बेलापूरपर्यंतच धावणार आहे. ठाण्यावरून पनवेलला जाण्यासाठी प्रवाशांना बेलापूरवरून लोकल बदली करावी लागणार आहे. सीएसएमटी ते पनवेल या मार्गावरील लोकलसेवा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे ठाण्यावरून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांनी बेलापूरला उतरून सीएसटी-पनवेल लोकलने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, हार्बर मार्गांवर मध्यरात्रीचा ब्लॉक घेण्यात आला असून सुरु असलेल्या कामामुळे रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावरील बेलापूर ते पनवेल लोकलसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील निर्णय येईपर्यंत या मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ठाण्यावरून सुटणाऱ्या लोकल देखील उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. बेलापूर ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल धावणार नसल्याची घोषणा प्रत्येक रेल्वे स्थानकांवर करण्यात येत आहे. या मार्गावरून फक्त ठाणे ते बेलापूरपर्यंत लोकल धावणार आहेत, असे सांगितले जात आहे. अचानक लोकल रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचा अनागोंदी कारभार समोर येत आहे. लोकल रद्द करण्याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही, असे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.