Join us

‘लोकल वेळेवर धावल्या पाहिजेत’

By admin | Published: June 24, 2016 4:50 AM

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तांत्रिक बिघाड होत आहेत. त्यामुळे उपनगरीय लोकल सेवेला मोठा फटका बसत

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तांत्रिक बिघाड होत आहेत. त्यामुळे उपनगरीय लोकल सेवेला मोठा फटका बसत असून, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत येऊन मध्य व पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेतली. यात लोकल वेळेवर धावण्याबाबत सूचना करतानाच तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजनाही त्यांनी सुचविल्या. वीज उपकेंद्रातून बॅटरी तसेच केबल चोरीला जाणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकलच्या पेन्टाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होण्याच्या घटना सातत्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर होत आहेत. त्यामुळे लोकल वक्तशीर नाहीत. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत तर वक्तशीरपणाची ऐशीतैशी होत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक कारणास्तव प्रवाशांना होत असलेल्या मनस्तापाची दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी.सी.अग्रवाल यांच्यासोबत बैठक घेतली. त्याला तांत्रिक बिघाड कारणीभूत ठरत असून, ते होऊ नयेत यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे, असेही अधिकाऱ्यांना सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेची मालमत्ता चोरीला जाऊ नये यासाठी सीसीटीव्ही आणि अलार्म यंत्रणा बसविण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली. बॅटरी आणि केबल चोरीला जात असल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड होत आहेत. त्याचीही माहिती रेल्वेमंत्र्यांनी घेत रेल्वे सुरक्षा दलाने गस्त वाढविण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी गस्तीत वाढ करण्याची सूचना त्यांनी केली. (प्रतिनिधी)२0 वीज उपकेंद्रांवर सेफ्टी अलार्ममाहीम येथील वीज उपकेंद्रातून १८ बॅटरींची चोरी करण्यात आली त्यामुळे प.रे. विस्कळीत झाली. या घटनेची दखल घेत आणि रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनंतर पश्चिम रेल्वेच्या २0 वीज उपकेंद्रांवर इमर्जन्सी सेफ्टी अलार्म बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमंत्री यांनी महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेतली. बिघाड होऊ नये आणि रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा व्यवस्थित राहावी यासाठी आरपीएफची गस्त, सीसीटीव्ही आणि आधुनिक यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे. - रवींद्र भाकर, (पश्चिम रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी)