Join us

लोकल सुरू होऊन एक महिना पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 7:00 PM

मध्य रेल्वेवर ३५ लाख, पश्चिम रेल्वेवर २६ लाख कर्मचाऱ्यांचा प्रवास 

 

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करून बुधवारी एक महिना पूर्ण झाला. या एका महिन्यात मध्य रेल्वे मार्गावर ३५ लाख प्रवासी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर २६ लाख कर्मचाऱ्यांनी प्रवास केला आहे. 

राज्य सरकारच्या निर्देशानुसार निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकल सुरु झाली. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गवरून  ३६२ लोकल फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली. यानंतर या फेऱ्यामध्ये वाढ करून एकूण ७०२ लोकल फेऱ्या आणि २ मेमु फेऱ्या धावण्यात आहेत. 

पश्चिम रेल्वे मार्गावरून एका महिन्यात सुमारे २६ लाख ९ हजार ९० अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी प्रवास केला. यातून पश्चिम रेल्वेला २ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न मिळाले. तर, मध्य रेल्वेवर सुमारे ३५ लाख ४६ हजार ३६६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी प्रवास केला. यातून मध्य रेल्वेला ३ कोटी ४६ लाखांचे उत्पन्न मिळाले. 

--------------------------------

अत्यावश्यक सेवेच्या लोकल पॉईण्ट टु पाईण्ट धावत आहेत. प्रवास करणार्‍या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना  राज्य सरकार क्यु आर कोड पास देणार आहे. हे पास पुढील आठवड्यात कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. क्यू आर कोड पास स्कॅन करूनच लोकलमध्ये प्रवेश मिळेल. गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार कार्यालयीन वेळा ठरवेल. सध्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, थर्मल तपासणीचे काम रेल्वे पोलीस,  आरपीएफ जवान करत आहेत. 

--------------------------------

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा आणि सुटण्याच्या वेळा एक असल्याने लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढते. परिणामी, लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होते. मात्र रेल्वे प्रशासनाने दोन प्रवाशांमध्ये अंतर राहण्यासाठी स्थानकात वर्तुळे तयार केली आहेत.  प्रवासी या वर्तुळात रांगेत उभे राहून लोकलची वाट बघत असतात. 

--------------------------------

 रेल्वे पोलीस, आरपीएफ यांच्याद्वारे स्थानकावर नियोजन केले जाते. स्थानकात येण्याचे-जाण्याचे प्रवेशद्वार निश्चित केले आहे. त्यातूनच ये-जा करण्याच्या सूचना सुरक्षा जवानांकडून दिल्या जात होत्या. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर दोरीने जागेची विभागणी केली आहे. याद्वारे कर्मचारी रांगेत प्रवास करतात. 

--------------------------------

मध्य रेल्वे प्रशासन लोकलची एक फेरी पूर्ण झाल्यावर स्वच्छता कर्मचारी सॅनिटायझरची फवारणी लोकलवर करतात. तर, पश्चिम रेल्वे प्रशासन दिवसातून दोनदा लोकल सॅनिटायझेशन करते.  मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सीएसएमटी येथे उभी असल्यावर तिच्यावर सॅनिटायझरची फवारणी केली जाते. बाहेरून आणि आतून लोकलवर फवारा मारला जातो. त्यानंतर ही लोकल दुसऱ्या फेरीसाठी वापरली जाते. 

--------------------------------

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सॅनिटाइझ करण्यासाठी दोन-तीन कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्याद्वारे संपूर्ण लोकल स्वच्छ केली जाते. यासह कारशेडमध्ये संपूर्णरित्या आतून-बाहेरून मशीनद्वारे लोकलची स्वच्छता केली जाते. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल दिवसातून दोनदा सॅनिटाइझ केली जाते. सकाळच्या सत्रात धावणाऱ्या लोकल दुपारनंतर सॅनिटायझरने स्वच्छ केल्या जातात. या लोकल कारशेडमध्ये रवाना केल्या जातात.  दुपारच्या सत्रात दुसऱ्या लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावतात. या लोकलच्या सर्व फेऱ्या संपल्यावर लोकल जंतुनाशक फवारणी केली जाते.  

 

 

टॅग्स :मुंबई लोकलमुंबईलॉकडाऊन अनलॉक