पश्चिम रेल्वेवर लोकलची रखडपट्टी सुरूच; सायंकाळी डाऊन जलद गाड्यांनाही उशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 06:11 AM2023-11-03T06:11:09+5:302023-11-03T06:11:56+5:30
आज १६८ फेऱ्या पूर्ववत; लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेने खार-गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी ब्लॉक सुरू असल्याने काही लोकल फेऱ्या रद्द आहेत. गुरुवारी सकाळी अप मार्गावरील अनेक गाड्या लेट होत्या तर सायंकाळी डाऊन मार्गावर देखील गाड्या ३० तासापेक्षा जास्त उशिराने धावत होत्या. यामध्ये विशेषतः बोरिवली आणि विरार गाड्यांना जास्त उशीर झाला. लोकल सेवा रद्द, त्यातच नियमितपणे धावणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने दादर, अंधेरी, बांद्रा, बोरीवलीसह इतर सर्वच स्थानकांत प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. संध्याकाळी कामावरून घरी निघालेल्या मुंबईकरांना लोकलची संख्या कमी असल्याने घरी पोहचला उशीर झाला आहे.
आज १६८ फेऱ्या पूर्ववत
मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने शुक्रवारी ३१६ फेऱ्या रद्द केल्या होत्या.
परंतु प्रवाशांची गर्दी पाहता रद्द १६८ फेऱ्या पूर्ववत केल्या असून १४८ फेऱ्या रद्द असणार आहेत, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका
- ४ नोव्हेंबर वापी विरार एक्स्प्रेस (रद्द)
- ५ नोव्हेंबर वांद्रे टर्मिनस वापी एक्स्प्रेस (रद्द )
शॉर्ट टर्मिनेट गाड्या:
- हजरत निजामुद्दीन वांद्रे टर्मिनस वापी पर्यंतच
- वेरावल वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस वापीपर्यंत
- वांद्रे टर्मिनस वेरावल एक्स्प्रेस वापीवरून सुटणार
- भगत की कोठी वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस डहाणू रोडपर्यंतच राहील.