मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या परतीच्या तिकिटाच्या कालावधीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आश्वासन रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा यांनी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांना दिले. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी परतीच्या तिकिटाचा कालावधी सहा तासांचा करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रवाशांनी विरोध केल्यानंतर आशिष शेलार यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबईत रोज सुमारे ७० लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असून, यामध्ये रोज तिकीट काढून प्रवास करण्याऱ्यांची संख्याही मोठी आहे. परतीच्या तिकिटाचा कालावधी कमी करण्याच्या प्रस्तावाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी असून, तीव्र नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे असा कोणताच बदल करू नये, अशी मागणी शेलार यांनी निवेदनाद्वारे केली. यावर रेल्वे राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, परतीच्या तिकिटाचा कालवधी कोणताही बदल करणार नसल्याचे आश्वासन दिल्याची माहिती शेलार यांनी दिली. रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी परतीच्या तिकिटाची वैधता सहा तासांपर्यंत कमी करण्याची सूचना मध्य रेल्वेने केली होती. सध्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांना परतीच्या तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच शनिवारी काढलेले परतीचे तिकीट सोमवारी सकाळपर्यंत वैध मानले जाते. मात्र या सुविधेचा गैरवापर होत असल्याचा दावा करत तिकिटाचा कालावधी कमी करण्याच्या हालचाली रेल्वेत सुरू होत्या. (प्रतिनिधी)
लोकलच्या तिकिटाचा कालावधी पूर्ववतच
By admin | Published: February 20, 2016 3:20 AM