मुंबई : मोबाइल पेपरलेस तिकीट सुविधा रेल्वेच्या क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सेंटर) संस्थेकडून उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. यानंतर आता साध्या मोबाइलवरही लोकलचे तिकीट देण्यासाठी प्रयत्न केले जात असून, ही सुविधा गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती क्रिसकडून देण्यात आली. रेल्वे मंत्रालयाकडून क्रिसच्या साहाय्याने मोबाइल तिकीट सेवा पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सुरू करण्यात आली. या सेवेचा लाभ घेताना एटीव्हीएमवरून प्रिंट घ्यावी लागत असल्याने प्रवाशांना मनस्तापच सहन करावा लागत होता. त्यानंतर पेपरलेस मोबाइल तिकीट सुविधा काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. या सेवेला अद्याप फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी त्याला प्रतिसाद वाढविण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. स्मार्ट फोन असलेल्यांना या सेवेचा फायदा मिळत असतानाच साधा मोबाइल असणाऱ्या प्रवाशांना मात्र त्याचा लाभ सध्या मिळत नाहीये. त्यामुळे अशा प्रवाशांनाही लोकलचे तिकीट मोबाइलवर उपलब्ध व्हावे या दृष्टीने क्रिस संस्थेकडून प्रयत्न केले जात आहेत. याबाबत क्रिसचे मुंबईतील महाव्यवस्थापक उदय बोभाटे म्हणाले की, साध्या मोबाइलवर लोकलचे तिकीट उपलब्ध करण्यासाठी आमच्याकडून आता लवकरच चाचणी केली जाईल. ही चाचणी केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेला चाचणीसाठी परवानगी दिली जाईल. त्याचा अहवाल या दोन्ही रेल्वे विभागांकडून क्रिस आणि रेल्वे बोर्डाला सादर केल्यानंतर ही सुविधा सुरू करण्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. गणेशोत्सवापूर्वी ही सुविधा उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
साध्या मोबाइलवरही लोकलचे तिकीट
By admin | Published: June 25, 2016 2:23 AM