Join us

सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ

By सचिन लुंगसे | Published: May 14, 2024 5:25 AM

गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य आणि हार्बर मार्गावर या ना त्या कारणाने लोकल गोंधळ सुरूच असून सोमवारी त्याचा अतिरेक झाला.

सचिन लुंगसे/अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई, ठाणे: मुंबईकरांसाठी सोमवारचा दिवस लोकल गोंधळाने उगवला. तर संध्याकाळ वादळी पावसाने संपली. ठाणे स्थानकाजवळ सकाळी साडेनऊच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड निर्माण झाल्याने कल्याण ते कुर्ला मार्गावर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा दीड तास विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी दुपारचे १२ वाजले. सायंकाळी घरी परतताना अवकाळी पावसाने मुंबईकरांना गाठले. मुलुंडनजीक सिग्नलचा खांब वादळामुळे वाकल्याने पुन्हा एकदा लोकल वाहतूक ठप्प झाली. 

गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य आणि हार्बर मार्गावर या ना त्या कारणाने लोकल गोंधळ सुरूच असून सोमवारी त्याचा अतिरेक झाला. सकाळी ठाणे स्थानकानजीक अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड निर्माण झाल्याने लोकलसेवा ठप्प झाली. त्यामुळे सकाळी अप मार्गावर लोकलगाड्यांची रांग लागली होती. कल्याण ते कुर्ला या मार्गावरील मुलुंड, भांडूप, नाहुर, घाटकोपर, विद्याविहार आणि कुर्ला या स्थानकांवर तुडुंब गर्दी जमली. अत्यंत कूर्मगतीने लोकल धावत होत्या. परिणामी अनेक प्रवाशांनी रेल्वे मार्गावरून चालणे पसंत केले. स्थानकांबाहेर जाऊन बस, टॅक्सी वा रिक्षा पकडून ऑफिस गाठण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याने तिथेही गोंधळाचे वातावरण होते. दुपारी १२ नंतर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली परंतु अनेक गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. दुपारनंतर वादळी पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. पश्चिम रेल्वेवरही  तांत्रिक बिघाडामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. 

घरी परतायला उशीर

सकाळचा गोंधळ निस्तरला जात असतानाच दुपारनंतर अचानक उठलेले वादळ आणि पाठोपाठ आलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा पुन्हा कोलमडली. त्यातच ठाणे ते मुलुंडदरम्यान सायंकाळी पाचच्या सुमारास सिग्नलचा खांब झुकल्यामुळे पुन्हा एकदा नोकरदारांची कोंडी झाली. घरी परतताना अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. अनेक जण सायंकाळी उशिरा घरी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत लोकल उशिराने धावत होत्या. 

मेल-एक्स्प्रेस लटकल्या

मध्य रेल्वे मार्गावर साडेचारच्या सुमारास मुलुंड ते ठाणेदरम्यानच्या ओव्हरहेड वायरवर खांब कोसळल्याने अप आणि डाऊन मार्ग ठप्प झाला होता. ऐन सायंकाळी पीक अवरला मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागत असतानाच ही घटना घडल्याने सीएसएमटीपासून मुलुंडपर्यंत सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती.

रात्री उशिरापर्यंत ओव्हर हेड वायरवर पडलेला खांब बाजूला काढून रेल्वेसेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते. दरम्यानच्या काळात लोकल प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मेल-एक्स्प्रेस रेल्वेगाड्या दोन तास उशिराने सोडण्यात येत होत्या. लोकलला प्राधान्य दिले जात होते. रात्री साडेसात वाजेपर्यंत लोकल पूर्ववत होईल, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत लोकलहाल सुरूच होते.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव हे नियंत्रण कक्षात दाखल झाले होते. वादळी पावसामुळे घडलेल्या घटनांनी लोकलला विलंब झाल्याचा आढावा घेत योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वेसेवा पूर्वपदावर आणण्याची सूचना त्यांनी केल्या होत्या. घाटकोपर रेल्वे स्थानकावरील एक आणि दोन क्रमांकाचे फलाट बंद होते. कुर्ला रेल्वे स्थानकातील इंडिकेटर बंद होते. धिम्या मार्गावरून जलद लोकल १५ ते २० मिनिटांच्या अंतराने सोडण्यात येत होत्या. मुलुंडवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल विलंबाने धावत होत्या. थोड्याशा पावसाने व पेंटाग्राफच्या समस्येमुळे मध्य रेल्वे कोलमडली, अशी टीका प्रवाशांनी समाज माध्यमांवर केली होती.

अनेक प्रवासी अडकून पडले होते. अनेक लोकल विलंबाने धावत होत्या. कुर्ला ते ठाणे हा प्रवास करण्यासाठी सव्वा तास लागत होता. रविवारी कामे करण्यासाठी ब्लॉक घेतला जातो. मात्र तरीही सोमवारी तांत्रिक बिघाड होतात हे वाईट आहे. - दिनेश हळदणकर, रेल्वे प्रवासी

मुंबई रेल प्रवासी संघातर्फे गेले अनेक वर्षे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून अशा घटना टाळता येतील. मात्र याकडे रेल्वे यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. - सिद्धेश देसाई, सरचिटणीस, मुंबई रेल्वे प्रवासी संघ

रोजच नवीन समस्या घेऊन मध्य रेल्वेचा दिवस उजाडतो आहे. यामुळे प्रवाशांसोबत नोकरदार वर्ग, औषधौपचारासाठी जाणारे रुग्ण, विद्यार्थी यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो आहे. - लता अरगडे, अध्यक्ष, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना

रेल्वे प्रशासनाने अशावेळी सर्वच रेल्वे स्थानकांवर घोषणा करत माहिती देणे अपेक्षित होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना माहिती मिळाल्याने काहीसा धीर मिळतो. - केतन शाह, सदस्य, झेडआरयूसीसी 

टॅग्स :मुंबई लोकलपाऊसमध्य रेल्वेपश्चिम रेल्वेहार्बर रेल्वे