- राज चिंचणकर मुंबई : नाट्यगृहांत नाट्यप्रयोग करण्यास परवानगी मिळाली असली, तरी सर्वसामान्य प्रवाशांना लोकल गाड्यांमध्ये पूर्ण वेळ प्रवास करण्यास अनुमती नसल्याचा फटका काहीअंशी नाटकांना बसत असल्याचे चित्र आहे. साहजिकच, मराठी नाटक सध्या ‘लोकल’कळांमुळे बऱ्यापैकी अडले असल्याचे स्पष्ट होत आहे. सकाळी ७ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ वाजल्यानंतर असे लोकलचे वेळापत्रक सर्वसामान्य नागरिकांसाठी सध्या ठरवून देण्यात आले आहे. या वेळा ज्याप्रमाणे नोकरदार व्यक्तींना उपयोगाच्या नाहीत; त्याचप्रमाणे नाट्यरसिकांना नाट्यगृहांकडे पोहोचविण्यासाठीही फायद्याच्या नाहीत. केवळ दुपारच्या प्रयोगासाठी फक्त नाट्यगृहात पोहोचण्यासाठी, रसिकांना त्याअनुषंगाने प्रवास करता येऊ शकतो. नाटक संपल्यावर, संध्याकाळी पुन्हा घरी जाताना लोकलची वेळ अर्थातच टळून गेल्याने रसिकांना वाहतुकीच्या इतर साधनांवर अवलंबून राहणे भाग आहे. अन्यथा संध्याकाळी ७ च्या सुमारास नाटक संपल्यावर, रात्री ९ वाजेपर्यंत लोकलसाठी खोळंबून राहण्याचाच पर्याय केवळ रसिकांसमोर आहे. दुपारच्या लोकल वेळेवर रसिकांची भिस्त आहे; परंतु त्याकरिता केवळ प्रवासासाठी उपयोगी पडणारी लोकल लक्षात घेता, रसिकजन नाट्यगृहांत जाण्याचा बेत काहीअंशी रद्द करताना दिसत आहेत. मुंबईत अजून सर्वच्या सर्व नाट्यगृहांत प्रयोग होताना दिसत नाहीत. घरापासून दुसऱ्याच विभागात असलेल्या नाट्यगृहात जाऊन नाटकांचा आस्वाद घेणे रसिकांना क्रमप्राप्त आहे. जोपर्यंत लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णवेळ सुरू होत नाहीत; तोपर्यंत नाट्यरसिकांच्या संख्येवर मर्यादाच येणार, अशी चर्चा याबाबत नाट्यगृहांवर ऐकू येत आहे. नाट्यरसिकांना नाट्यगृहांकडे पोहोचविण्यासाठीही नाहीत.
मराठी नाटकांच्या अडलेल्या ‘लोकल’कळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 3:26 AM