मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का?; निर्बंधांबाबत विजय वडेट्टीवारांनी केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:32 PM2021-05-24T14:32:21+5:302021-05-24T15:35:06+5:30

जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करण्याबाबत विचार करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

The local train will not be open for all passengers for the next 15 days, said Minister Vijay Vadettiwar | मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का?; निर्बंधांबाबत विजय वडेट्टीवारांनी केलं मोठं विधान

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का?; निर्बंधांबाबत विजय वडेट्टीवारांनी केलं मोठं विधान

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील रविवारी माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनबाबत महत्वाची माहिती दिली होती. 

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. '१ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. 

सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकानं केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील चिंताजनक नाही. त्यामुळे या भागातील निर्बंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्यानं मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे. 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथले निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील. तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करण्याबाबत विचार करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात आहे. पुढच्या पाच ते सहा दिवसात काय परिस्थिती असेल हे पाहून निर्णय घेतला जाईल, असं विजय वडेट्टीवर यांनी सांगितलं.

मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, पण संपलेला नाही. लोकल ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे लोकल पुढील १५ दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

लॉकडाऊनबद्दल काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी कोकण दौरा केला. त्यावेळी त्यांना लॉकडाऊनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. 'कोरोना कमी होतोय हे नक्कीच. पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्यावेळी आपण अनुभव घेतलाय. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण, थोडीशी शिथिलता आली अन् कोविड चौपटीने वाढला'', असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं

Read in English

Web Title: The local train will not be open for all passengers for the next 15 days, said Minister Vijay Vadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.