मुंबई: शहरातील कोरोना बाधितांचा आकडा २ लाखांच्या पुढे गेला आहे. सध्याच्या घडीला मुंबईत २६ हजार ६६० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६७ दिवसांवर गेला असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२ टक्क्यांवर पोहोचलं आहे. आतापर्यंत १ लाख ६४ हजार ८८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था बऱ्यापैकी सुरू झालेली असली, तरीही अद्याप शहराची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झालेली नाही. ही लोकल सेवा सर्वांसाठी कधी सुरू होणार याबद्दलचे संकेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी दिले आहेत.'सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवेतल्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी आहे. त्यांची संख्या जास्त असल्यानं आता लोकल गाड्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. याबद्दल रेल्वे प्रशासनाशी संवाद सुरू आहे. लोकल गाड्यांची संख्या वाढवल्यावर अधिक जणांना प्रवासाची परवानगी दिली जाईल. अन्यथा प्रवासाच्या इतर साधनांवरील ताण वाढेल,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार, हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. त्याबद्दल आदित्य ठाकरेंनी महत्त्वाचे संकेत दिले. 'ऑक्टोबरच्या मध्यावर लोकल सुरू केल्या जाण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या आणखी काही सुविधा सुरू करण्याचाही आमचा विचार आहे. आम्ही अनेक गोष्टी थोडा वेळ घेऊन विचारपूर्वक सुरू करत आहोत. कारण एकदा सुरू केलेल्या गोष्टी आम्हाला पुन्हा बंद करायच्या नाहीत,' असं आदित्य यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला सांगितलं.शहरातील कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 'मुंबईत विविध प्रकारची कार्यालयं आहेत. त्यांच्या वेळा बदलण्याचं काम अवघड आहे. सध्या आम्ही विविध कार्यालयं, संकुलं आणि कार्पोरेट्सशी कामाच्या वेळांमध्ये बदल करण्याविषयी चर्चा करत आहोत. कार्यालयं २४ तास सुरू ठेवण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना काळातच नव्हे, तर त्यानंतरही प्रवासी वाहतुकीवरील भार, वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कामाच्या वेळा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा?; आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत
By कुणाल गवाणकर | Published: September 29, 2020 1:42 PM