लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर मिठी नदीवरील पुलाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे लोकलचा वेग १०० ते ८० वरून २० इतका करण्यात आला. त्यामुळे शनिवारी सकाळपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवेला लागलेला लेटमार्क दुपारपर्यंत कायम होता. परिणामी कायम वेळेवर धावणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागले.
मिठी नदीवरील रेल्वे पुलाचे काम शुक्रवारी रात्री ११ पासून रविवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या भागातून सुरक्षेसाठी सुरुवातीचे तीन ते चार दिवस लोकल २० आणि नंतर काही दिवस ३० ते ४० किमी इतक्या वेगाने चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे याचा रेल्वेच्या वेळापत्रकात परिणाम होणार आहे. त्याचाच फटका शनिवारी प्रवाशांना मोठा बसला आणि प्रवाशांनी रेल्वेच्या नावाने बोटे मोडली.
एक खांब कमकुवतमिठी नदीवरील पुलाचा एक खांब कमकुवत झाल्याने तो तोडून नवीन बनविला जात आहे. त्यासाठी ९ मीटरचा गर्डर काढून नवीन २१ मीटरचा तात्पुरता गर्डर बसवला आहे. रविवारीदेखील हे काम करण्यात येणार आहे.
सकाळी बोरीवलीवरून प्रभादेवीच्या दिशेने ऑफिसला जायला निघालो होतो. पण सांताक्रूझजवळ ट्रेन एकच ठिकाणी थांबून होती. त्यामुळे ऑफिसला पोहोचायला उशीर झाला.विजय कांबळे, प्रवासी