लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार आहे. एका महिन्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम वाढविण्यात आली आहे. शाळा ३१ डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाहीत. सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव दिला आहे. लोकल सेवा लवकर सुरू हाेतील, असा आशावाद मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांसमाेर व्यक्त केला. मात्र अजूनही सर्वसामान्य मुंबईकर लाेकल सेवा सुरू हाेण्याच्या आशेवरच आहेत.
इक्बाल सिंह चहल म्हणाले, गणेशोत्सव, बकरी ईद, मोहरम, नवरात्रोत्सव आणि दिवाळीत मुंबईकरांनी चांगले सहकार्य केले. यासाठी त्यांना सलाम आहे. दिवाळीत लोकांनी फटाके न उडविण्याबाबत सहकार्य केले. कोरोनाचा आकडा पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्यामुळे तो लपविण्याचा प्रश्नच येत नाही. कोरोनाविरोधात लढा सुरूच आहे. रोज एक युद्ध जिंकावे लागत आहे. कोरोनाविरोधातील लढाई मोठी आहे. कोरोनावाढीचा दर ०.२२ टक्के आहे. दिवाळीत ५०० रुग्ण आढळले होते. आता हा आकडा एक हजार झाला आहे. मुळात दिवाळीत कमी म्हणजे केवळ ५ हजार चाचण्या झाल्या. आता १८ हजार चाचण्या झाल्या. या चाचण्यांत पॉझिटिव्ही ५.८ टक्के आली. तेव्हा ती १० टक्के होती. आजपर्यंतची ही सर्वात कमी पॉझिटिव्हिटी आहे.
‘पुढील तीन ते चार आठवडे महत्त्वाचे’आज डबलिंग रेट ३१० दिवस झाला आहे. रुग्णालयात १३ हजार खाटा आहेत. ८६७ आयसीयू आहेत. मास्कबाबत आपण दररोज १५ हजार लोकांना दंड आकारत आहोत. ४ लाख लोकांना दंड आकारण्यात आला आहे. आता दिवसाला २५ हजार लोकांना दंड आकारण्यात येईल. १० लाख लोकांना दंड आकारला जाईल. पुढील काही दिवसांत मुंबईत कोणतेही नवीन निर्बंध घातले जाणार नाहीत, पण पुढील तीन ते चार आठवडे गंभीर आहेत. आम्ही कदाचित तीन ते चार आठवड्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊ आणि नंतर पुन्हा निर्णय घेऊ, असेही चहल यांनी सांगितले.