मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळाल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. लॉक डाउन कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करीत असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना लोकल रेल्वेने प्रवास करता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रशाससनाला दूरध्वनीद्वारे कळविले असून, दोन दिवसात लेखी परवानगी देखील येईल.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना ओळखपत्र दाखविल्यावर लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार आता लोकल ने प्रवास करू शकतील, याची सर्व गोदी कामगारांनी नोंद घ्यावी असे आवाहन डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनतर्फे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांनी केले आहे. लॉक डाऊन कालावधीत मुंबई बंदराच्या कामगारांनी व अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून दहा लाखाहुन अधिक टन मालाची चढउतार केली. जहाजावर काम करणाऱ्या 10 हजार 900 खलाशी कामगारांना मुंबई बंदरात उतरून घेतले. लॉक डाउन कालावधीत वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात कोविड 19 च्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई शहरातील मुंबई बंदराचे महत्व लक्षात घेऊन गोदी कामगारांना मुंबईमध्ये लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मिळणेबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष शसंजय भाटीया, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस सुधाकर अपराज, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरशी पारेख व इतर सर्वांनी प्रयत्न केले होते. युनियनच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून मागणी केली होती. अखेरीस मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मिळाली त्यामुळे कर्मचारी समाधान व्यक्त करत आहेत.