मुंबई: उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेने खुश खबर दिली आहे. एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येणार असून, बुधवार, १६ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मध्य रेल्वेवर तूर्तास सहा एसी लोकल आहेत. त्यापैकी पाच लोकल दिवसभरात ६६ फेन्या पूर्ण करतात. एक लोकल देखभालीसाठी राखीव असते.
प्रशासनाने त्यांच्या ताफ्यात असलेली अंडरस्लंग एसी लोकल वापरात आणण्याचा निर्णय घेतल्याने लोकलची संख्या सात होईल. परिणामी फेऱ्यांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे बुधवारपासून एसी लोकलच्या फेऱ्या ६६ वरून ८० होतील.
सीएसएमटी ते बदलापूरदरम्यान या गाड्या चालविल्या जाणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
नवीन वातानुकूलित सेवा विद्यमान नॉन एसी सेवांची जागी चालवण्यात येतील, ज्यामुळे दररोज एकूण उपनगरीय सेवांची संख्या १,८१० राहील.
या सेवा सोमवार ते शनिवार चालतील, रविवार आणि निर्धारित सुटीच्या दिवशी नॉन - एसी रेकसह संबंधित सेवा सुरू राहणार आहेत.