मुंबई : मुंबईकरांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या मुंबई पोलिसांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून एक गोड भेट मिळाली आहे. विविध गुन्ह्यांचा तपास करीत असताना उपनगरीय रेल्वे (लोकल)मधून करण्यात येत असलेल्या प्रवासावेळी त्यांना आता तिकीट तपासणीसाबरोबर हुज्जत घालावी लागणार नाही. त्यांना लोकलमधून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी गणवेष परिधान करणे अनिवार्य आहे.रेल्वे पोलीस दलाने नुकताच हा निर्णय घेतला असून पश्चिम व मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना त्याबाबत कळविण्यात आले आहे.मुंबई पोलीस लोकलमधून विनातिकीट तसेच अपंगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून सर्रासपणे प्रवास करतात, त्याबाबत‘टीसी’कडून कारवाई करताना वादावादीच्या अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत रेल्वेने अनेकवेळा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून कळविले होते.त्याच अनुषंगाने याबाबत दोन्ही घटकांतील अधिका-यांमध्ये ३० सप्टेंबरला बैठक झाली होती. त्यामध्ये तपासकामासाठी गणवेषावर प्रवास करणाºया पोलिसांना मोफत प्रवास करण्याची मुभा असावी, असा प्रस्ताव बनविण्यात आला. त्याला रेल्वे पोलीस दलाच्या महासंचालकांनी हिरवा कंदील दाखविला असल्याचे अधिकाºयाने एका परिपत्रकाद्वारे प्रशासनाला कळविले आहे. मात्र गणवेषाशिवाय प्रवास करणाºया पोलिसांनी आवश्यक तिकीट बाळगणे अनिवार्य असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांना लोकल प्रवास मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 7:21 AM