लोकल विरुद्ध बुलेट ट्रेन, वातावरण तापले, प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 06:35 AM2017-09-30T06:35:53+5:302017-09-30T06:36:08+5:30
एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेत २२ प्रवाशांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर ३९ प्रवाशांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई : एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेत २२ प्रवाशांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर ३९ प्रवाशांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेने मुंबई हळहळली असून, संतप्त मुंबईकरांनी याचे खापर रेल्वे प्रशासनावर फोडले आहे. महत्त्वाचे म्हणजे येथे बुलेट टेÑन सुरू करण्याआधी इथल्या लोकल सुधारा, असा आवाज मुंबईकर रेल्वे प्रवाशांनी उठविला असून, सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या गर्दीचा मुंबईकरांना वीट आला आहे. दररोज रेल्वेची गर्दी वाढतच असून, रेल्वेच्या फेºयांसह लोकलची संख्या आणि डबे वाढविले तरी गर्दी काही कमी होत नाही. आणि वाढत्या गर्दीला पायाभूत सेवा-सुविधा पुरविण्यात रेल्वे प्रशासन कमी पडते आहे. पादचारी पुलापासून उर्वरित अनेक सेवांसाठी मुंबईकरांनी केंद्राला साकडे घातले असले तरी प्रत्यक्षात केंद्राने मुंबईच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
अर्थसंकल्प असो वा अन्य काही. मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या मागण्या पूर्वीपासूनच डावलण्यात आल्या आहेत. परिणामी वाढती गर्दी, अपुºया सेवा-सुविधा अशा अनेक समस्यांनी मुंबईकर रेल्वे प्रवाशांना ग्रासले आहे. उपनगरीय रेल्वे सेवांचा बोजवारा उडाला असताना, पायाभूत सेवा-सुविधांची वानवा असताना, दुसरीकडे केंद्राने बुलेट टेÑनचा घाट घातला आहे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या महानगरी मुंबईला बुलेट टेÑनची कशी अत्याधिक गरज आहे, हे पटवून दिले जात आहे.
महापालिकेची धावाधाव
एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिकाही खडबडून जागी झाली. शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील रेल्वे पूलावर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला मिळाली. माहिती प्राप्त होताच मदतीकरिता १०८ आणीबाणी वैद्यकीय सेवेच्या दहा रुग्णवाहिका, १२९८ रुग्णवाहिका सेवेची एक आणि केईएम रुग्णालयाच्या तीन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.
घटनेची माहिती प्राप्त होताच केईएम रुग्णालयाच्या अपघात विभागास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिवाय याबाबतची माहिती महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित नियंत्रण कक्ष, लोकप्रतिनिधींना कळविण्यात आली. दरम्यान, या घटनेत एकूण ६१ प्रवासी जखमी झाले. यापैकी २२ प्रवाशांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
रेल्वे मंत्री बदलूनदेखील रेल्वे अपघात थांबत नाहीत. त्यामुळे खरी समस्या ही संपूर्ण रेल्वे प्रशासन व्यवस्थेत आहे. अपघाताचे प्रश्न हे मुळासकट सोडवायला हवेत. जादा गाड्या, रेल्वे स्थानक, पादचारी पूल यांची खरी आवश्यकता आहे.
- भास्कर सॅम्युअल, दादर रेल्वे स्थानक
रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. सामान्यांचा जीव हा कवडीमोल झाला आहे. नवीन काहीतरी उपाययोजना रेल्वे प्रशासनाने कराव्यात. रेल्वे पादचारी पुलांची रुंदी ही जास्त असावी, जेणेकरून प्रवाशांना योग्यरीत्या चढ-उतार करता येईल.
- प्रसन्न कुमार, कुर्ला रेल्वे स्थानक
मोठ्या पुलाची आवश्यकता आहे. ज्या पुलावर एक माणूस उभा राहत नाही. तिथे रेल्वे प्रशासनाने दुभाजक उभे केले आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. दादर स्थानकांवर जसा मोठा पूल आहे तसा पूल परेल स्थानकांवर असावा. परेल स्थानकांवर ठाण्याच्या बाजूला जो पूल बांधला त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाजूला बांधणे आवश्यक होते. तो बांधला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. पोलिसांनी फक्त शिट्टी वाजवून चालणार नाही तर शिस्त लावणे आवश्यक आहे.
- प्रवीण शितोळे, दादर रेल्वे स्थानक
दरदिवशी रेल्वे प्रवासात अशा अपघातांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. नोकरीनिमित्ताने सर्व जण मुंबईच्या लाइफलाइनने प्रवास करतात; पण तोच प्रवास जीवघेणा ठरत आहे. शासनाने आता तरी जागे होऊन यावर काहीतरी तोडगा काढावा.
- योगिता खरात,
करी रोड रेल्वे स्थानक
रेल्वे प्रवास करणे खूप त्रासदायक होत आहे. एकीकडे सरकार बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवते आणि दुसरीकडे असे अपघात होतात ही बाब खूप लाजिरवाणी आहे. प्राण्यांपेक्षाही भयानक मृत्यू माणसांचा होत आहे.
- राजेंद्र थोरात,
कुर्ला स्थानक
स्टेशनबाहेरील १ किमीपर्यंतचा परिसर फेरीमुक्त असावा. पुलांची रुंदी मोठी असावी. प.रे.ला बांधलेला अर्धवट पूल एल्फिन्स्टन रोड स्टेशनला जोडला पाहिजे. त्यामुळे परेल स्थानकावरील गर्दी कमी होईल. रेल्वेचा निधी कमी पडत असेल तर मुंबईतील ३४ आमदार, ६ खासदारांनी आपल्या निधीतून रक्कम द्यावी.
- सुहास रामटेके,
दादर रेल्वे स्थानक
वारंवार प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार करूनही आजपर्यंत कुणीही दखल घेतली नव्हती. या घटनेला रेल्वे प्रशासनाव्यतिरिक्त पोलीस यंत्रणा जबाबदार आहे. एक सामान्य नागरिक म्हणून मोदी सरकारला विनंती आहे की, परदेश दौरे करण्यापेक्षा भारत दौरे करावेत.
- मयूर खिडबिडे, दादर रेल्वे स्थानक
रेल्वे प्रवासात अशा अपघाताच्या घटना घडतात; हे खेदजनक आहे. सकाळी कामावर जाणारी व्यक्ती संध्याकाळी घरी सुखरूप येईल की नाही याची खात्री नसते. रेल्वे प्रशासनाने यावर ठोस पावले उचलायला हवीत. कुर्ला स्थानकावर अशी घटना होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने काही उपाय राबवावेत.
- ज्ञानेश्वर बागडे,
कुर्ला रेल्वे स्थानक