Join us  

दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल; फेऱ्यांची संख्या वाढणार, रेल्वेमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 6:34 AM

यातील तांत्रिक अडचणी दूर करत तीनही मार्गांवरील लोकलना कवच प्रणालीबरोबरच कम्बाइन कम्युनिकेशन्स बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणा जोडली जाणार आहे.

मुंबई : मुंबईकरांना अनेकदा प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत ताटकळावे लागते. वस्तुत: दोन लोकलमधील अंतर तीन मिनिटांचे आहे. परंतु, अनेकदा दुसरी लोकल यायला वेळ लागतो.

यातील तांत्रिक अडचणी दूर करत तीनही मार्गांवरील लोकलना कवच प्रणालीबरोबरच कम्बाइन कम्युनिकेशन्स बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणा जोडली जाणार आहे. त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर १८० सेकंदांवरून १५० सेकंदांवर (अडीच मिनिटे) येणार आहे. अशा प्रकारची प्रणाली लाभणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे. या प्रणालीमुळे येत्या तीन वर्षांत लोकल फेऱ्यांची संख्या दुपटीने वाढणार आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान या प्रणालीविषयी माहिती दिली. या प्रणालीमुळे मुंबईकरांना तीन मिनिटांऐवजी अडीच मिनिटांतच दुसरी लोकल मिळेल. परिणामी फेऱ्यांची संख्या वाढून प्रवास वेगवान होणार आहे. रेल्वेमंत्री म्हणाले की, केंद्र सरकार भारतातील सर्व रेल्वेमार्गांवर कवच यंत्रणा बसविण्याचे काम करत आहे. त्यामुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

३५० नवीन एसी लोकलची तयारी

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, मुंबई उपनगरीय रेल्वेवर ३५० नवीन एसी लोकल विकत घेण्यासाठी रेल्वेची निविदा तयार आहे. परंतु, स्थानिक राजकीय विरोधामुळे आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही आहोत. सध्या पश्चिम आणि मध्य उपनगरीय मार्गांवर रेल्वेच्या एकूण १४ एसी लोकल धावत आहेत. या लोकल प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या होत्या. एसी लोकलसाठी प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्याने भविष्यात अतिरिक्त एसी लोकल प्रवाशांना मिळणार आहेत.

मुंबईकर प्रवाशांना दिलासा

            येत्या काळात मुंबई उपनगरीय सेवांवर कवच सोबत सीबीटीसी प्रणालीचे एकत्रीकरण करून ही नवी यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

            हा प्रयोग सर्वांत आधी उपनगरीय रेल्वेवर करण्यात येणार असल्याने रेल्वे अपघात कमी होण्यासोबतच दोन गाड्यांमधील वेळ कमी करण्यास मदत होणार आहे.

            त्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांना येत्या काही महिन्यांत जास्त वेळ ताटकळत स्थानकावर थांबावे लागणार नाही.

टॅग्स :रेल्वे