मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर डीसी-एसी परावर्तन पाच दिवसांपूर्वीच करण्यात आले. मात्र हे परावर्तन केल्यानंतर सलग पाचव्या दिवशी लोकल गाड्यांना लेट मार्क लागत असून, दर दिवशी ५00 पेक्षा जास्त लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. याचा प्रवाशांना मनस्ताप होत असतानाच लोकल वेळेवर धावण्यासाठी कोणतेही नियोजन होताना दिसत नाही. हा मनस्ताप होतानाच मध्य रेल्वेचे अधिकारी मात्र परावर्तनाची पार्टी साजरी करण्यात व्यस्त असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते सीएसटीदरम्यान डीसी ते एसी परावर्तन ८ जून रोजी पूर्ण करण्यात आले. यामुळे मध्य रेल्वेमार्गावर ताशी १00 किमी वेगाने गाड्या धावणे शक्य होणार असून, विजेचीही बचत होणार आहे. मात्र या परावर्तनामुळे सात दिवस लोकल उशिराने धावतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आल्यानंतर परावर्तन झाल्याच्या दोन दिवसांनंतर तिसऱ्या दिवसापासून लोकल पूर्ववत होतील, असे आश्वासन देण्यात आले. मात्र लोकल काही केल्या वेळेवर धावत नसल्याचे समोर येत आहे. परावर्तन होताच त्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ६५ लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. तर ५१ लोकल अंशत: रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे ५00 पेक्षा जास्त लोकल उशिराने धावल्या. त्यानंतरही लोकल उशिरानेच धावत असून सलग पाचव्या दिवशी लेट मार्कचा फटका प्रवाशांना बसत आहे. सलग पाच दिवशी १५ मिनिटे उशिराने लोकल धावत असून दररोज ५00 पेक्षा जास्त लोकल गाड्यांना त्याचा फटका बसत असल्याचे मध्य रेल्वेचे अधिकारीच सांगतात. मात्र या गाड्या वेळेवर धावण्यासाठी त्याचे नियोजन न करताच रेल्वे अधिकारी मात्र यशस्वी झालेल्या परावर्तनाची पार्टी साजरी करण्यात दंग झाल्याचे समोर आले. शुक्रवारी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील निर्मल पार्क येथे पार्टी साजरी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यात रेल्वेचे सर्व अधिकारी सामील होते. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवाशांना मोठा मनस्ताप होतानाच त्याची दखल न घेण्याचे काम मध्य रेल्वेकडून करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
लोकलची रखडपट्टी
By admin | Published: June 13, 2015 4:16 AM