Join us

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीत पालिकेचे ‘गोलमाल’, स्थानिकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:43 AM

दीड महिना उलटूनही अंतिम अहवाल नाही.

मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा अंतिम अहवाल दीड महिना उलटूनही जाहीर करण्यात आलेला नाही. पालिका प्रशासनाकडून तज्ज्ञांच्या समितीमध्ये त्यांच्या मर्जीतील सल्लागार बसवले असून, अहवालाच्या निरीक्षणामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या स्थानिक रहिवाशांच्या समूहाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन पालिका प्रशासन आवश्यकता नसताना जलाशयाच्या पुनर्बांधणीचा घाट घालत असल्याची टीका केली. या सर्व पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने अंतरिम अहवालातील निरीक्षणे व निष्कर्ष यांच्यावर शिक्कामोर्तब करून तो अंतिम करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प २०१७ मध्ये १८५.९४ कोटी इतका प्रस्तावित होता, मात्र तो आता ७०० कोटींवर पोहोचला आहे. या शिवाय मलबार हिल जलाशयाच्या ५ टाक्यांची जलधारण क्षमता एकूण १४७.७८ दशलक्ष लिटर असताना त्यामधील केवळ ७९.७३ दशलक्ष लिटर पाणीसाठाच वापरला जातो. 

मग नवीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा घाट पालिका प्रशासन का घालत आहे, असा प्रश्न मलबार हिल जलशयाच्या पुनर्बांधणीला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. जलाशयाच्या नवीन टाकीसाठी हँगिंग गार्डन परिसरातील तब्बल ३९३ झाडांची कत्तल होणार असून, त्यानंतर ओढवणाऱ्या परिणामांना कसे सामोरे जाणार असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.

तज्ज्ञांच्या समितीमध्ये सल्लागार कशासाठी?

१) पालिकेकडून स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीमध्ये तीन आयआयटी प्राध्यापकांचा समावेश असून, हे तिन्ही प्राध्यापक यापूर्वी पालिकेच्या अहवाला सादरीकरणात सल्लागार म्हणून नियुक्त होते.

२) असे असताना पालिकेकडून या तिघांची निवड का करण्यात आली? पालिका प्रशासनाला समितीच्या अहवालात काही फेरफार करायचे होते का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मलबार हिल जलाशय सुरक्षित आणि सुस्थितीत आहे.

३) मलबार हिल जलाशयातील कोणतीही दुरुस्ती, डागडुजी तत्काळ करावीच अशी नाही.

४) जलाशयाच्या टाक्याची दैनंदिन देखभाल याविषयी नियम पाळणे आवश्यक आहे.

५) जलाशयाच्या बोगद्यांमध्ये तयार होणाऱ्या क्लोरीनसाठी योग्य वायुविजन प्रणाली आवश्यक आहे.

तज्ज्ञांनी दिलेला अंतरिम अहवाल काय म्हणतो?

मलबार हिल जलाशयाच्या निर्णयात पालिका वेळकाढूपणा करत आहे. तातडीच्या दुरुस्त्या आवश्यक नसताना पुनर्बांधणीचा घाट म्हणजे घोटाळ्याचा प्रकार आहे. तज्ज्ञांनी दिलेला अहवाल पालिकेने अंतिम म्हणून स्वीकारावा. - रवी मांद्रेकर, स्थानिक सदस्य, मलबार हिल कोअर कमिटी

टॅग्स :मुंबईनगर पालिका