Join us

गोराई गावातील पाण्याच्या समस्येमुळे स्थानिक झाले आक्रमक

By मनोहर कुंभेजकर | Published: November 08, 2022 7:37 PM

पालिका अभियंत्याला माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि गोराईकरांनी घेरले

मुंबई- गोराई गावातील पाण्याच्या समस्येमुळे स्थानिक  आक्रमक झाले. काल दुपारी चार वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका आर/मध्य विभाग, जल खात्याचे कनिष्ठ अभियंता अवधूत पवार पाहणी करायला गेले  होते. पालिका अभियंत्याला माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि गोराईकरांनी दुपारी 4 ते काल रात्री 10.30 पर्यंत त्यांना  घेरले होते. अखेर गोराई गाव पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांची सुटका केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल दुपारी चार वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका आर/मध्य विभाग, जल खात्याचे कनिष्ठ अभियंता अवधूत पवार पाहणी करायला गेले  होते. त्यांना चक्क रात्री उशिरा 10.30 पर्यंत त्यांची सुटका केली नाही. अखेरीस गोराई गाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी मंदाकिनी नरवटे  आणि इतर पोलीस कॉन्स्टेबल यांच्या मध्यस्थीने पालिका अभियंत्याची काल रात्री उशिरा सुटका झाली.

गेले 6 महिने येथे पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्यामुळे स्थानिकांमधील असंतोष  हा शिगेला पोहोचला आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि गोराई मच्छीमार संघटनेचे कॅसिओ, दिनेश वसईकर आणि ऑलडीन वसईकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी त्यांना घेरले. जमाव हळूहळू वाढत गेला.

 गोराई गावाला मालाड वरून पाणी येते.मात्र अनेकांनी अनधिकृत जलजोडणी केल्याने गोराई गावात भीषण पाणी टंचाई आहे अशी माहिती शिवानंद शेट्टी यांनी लोकमतला दिली.याप्रकरणी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जातीने लक्ष देवून गोराई गावातील पाणी टंचाई दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आर मध्य विभागाचे वॉर्ड ऑफिसर प्रकाश विचारे , हायड्रॉलिक इंजिनीअरिंग डिपार्टमेंटचे माळवदे , कार्यकारी सहाय्यक सोंडे  यांनी पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे आश्वासन त्यांनी गोराईकरांना दिले आहे.

टॅग्स :मुंबई