Join us  

लोकलने तोडला सिग्नल

By admin | Published: February 23, 2016 1:20 AM

७२ तासांच्या मेगाब्लॉकमधून हार्बरवासीयांची सोमवारी सुटका होईल असे वाटत असतानाच सकाळपासून पुन्हा एकदा खोळंबा झाला. सीएसटी स्थानकात जाणाऱ्या एका लोकलने लाल

मुंबई : ७२ तासांच्या मेगाब्लॉकमधून हार्बरवासीयांची सोमवारी सुटका होईल असे वाटत असतानाच सकाळपासून पुन्हा एकदा खोळंबा झाला. सीएसटी स्थानकात जाणाऱ्या एका लोकलने लाल सिग्नल ओलांडला. मात्र एडब्ल्यूएस (आॅक्झिलरी वॉर्निंग सिस्टिम) यंत्रणेमुळे लोकल जागीच थांबली आणि पुढील अनर्थ टळला. अन्यथा सीएसटी स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एका लोकलला धडक बसून मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर हार्बरवरील लोकल गाड्यांना लेटमार्क लागला आणि आठवड्याच्या पहिल्याच वर्किंग डेला हार्बर मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणी लोकलच्या मोटरमनला निलंबित करण्यात आले आहे. अंधेरीहून सीएसटीला जाणारी एक लोकल सकाळी साडे सातच्या सुमारास सीएसटी प्लॅटफॉर्म क्रमांक २वर जाणार होती. ही लोकल सीएसटीजवळ येताच तिला लाल सिग्नल दाखविण्यात आला. मात्र या लोकलने धोकादायक रेषा ओलांडली; पण ट्रॅकवर असणारी एडब्ल्यूएस यंत्रणा कार्यरत होऊन लोकलचे ब्रेक लागले आणि लोकल जागीच थांबली. ही घटना घडली त्याचवेळी सीएसटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक २वरून वांद्रे स्टेशनसाठी लोकल निघाली होती. एडब्लूएस यंत्रणा नसती तर मोठी दुर्घटना घडली असती, असे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सुमारे अर्ध्या तासानंतर ही लोकल जागेवरून हलवून प्लॅटफॉर्म क्रमांक २वर नेण्यात आली. (प्रतिनिधी)काय आहे एडब्लूएस यंत्रणासीएसटी स्टेशनजवळच सुरुवातीला (मशीदच्या दिशेने) एडब्लूएस यंत्रणा ट्रॅकवर बसविण्यात आली आहे. एखाद्या लोकलने रेड सिग्नल ओलांडला किंवा प्रवेश करताना ठरवून दिलेल्या वेगापेक्षा जास्त वेग असला तर ही यंत्रणा कार्यरत होते आणि लोकलचे ब्रेक लागून लोकल जागीच थांबते. सीएसटी स्थानकाजवळ रेड सिग्नल असतानाही एका लोकलने सिग्नल ओलांडला. त्यामुळे तांत्रिक समस्या उद्भवली. या घटनेनंतर मोटरमनला निलंबित करण्यात आले आहे. - नरेंद्र पाटील (मध्य रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी)