Join us

मुलुंडचा थांबा लोकल विसरली, पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:38 AM

यामुळे लोकलमधील प्रवासी आणि फलाटावरील प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बदलापूर ही लोकल नेहमीचा थांबा असलेल्या मुलुंड स्थानकात न थांबता पुढे गेल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. यामुळे लोकलमधील प्रवासी आणि फलाटावरील प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर फलाट गेल्यानंतर प्रवाशांनी चेन ओढल्यामुळे लोकल आपत्कालीन ब्रेकमुळे थांबली. या प्रकरणी मध्य रेल्वेने चौकशीचे आदेश दिलेआहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी जलद लोकल बदलापूर दिशेला रवाना झाली. या जलद लोकलला मुलुंड स्थानकात थांबा होता. मुलुंड स्थानकात फलाट क्रमांक ३वर बदलापूर जलद लोकल येण्याची उद्घोषणा होत होती. मात्र मुलुंड स्थानकातील फलाट दृष्टिक्षेपात आल्यानंतरही लोकलचा वेग कमी झाला नाही. अखेर फलाटात लोकल न थांबता पुढे निघून गेल्यामुळे प्रवाशांनी चेन ओढत लोकल थांबविण्याचा प्रयत्न केला. चेन ओढल्यामुळे मोटरमनने आपत्कालीन ब्रेक लावून लोकल थांबविली. मात्र तोपर्यंत पूर्ण लोकल मुलुंड फलाटातून पुढे निघून गेली होती. या वेळी ब्रेक फेल झाल्याचीदेखील अफवा होती. महिला बोगीतील प्रवाशांनी गार्डला लोकल मागे घेण्याची विनंती केली असता, ‘चूपचाप अगले स्टेशन पे उतरो,’ असा उलट दम भरण्यात आल्याचा आरोप महिला प्रवाशांनी केला आहे.

या प्रकरणी मध्य रेल्वेने संबंधित लोकलच्या मोटरमन आणि गार्डच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका प्रवाशांना बसल्याचे दिसून आले. यापूर्वीदेखील मध्य रेल्वेवरील लोकल सिग्नल ओलांडणे, चुकीच्या सिग्नलमुळे लोकल भरकटणे असे प्रकार घडले आहेत.

टॅग्स :मुंबई लोकल