लोकलचे सध्याचे वेळापत्रक १५ दिवसांनी बदलणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:08 AM2021-02-09T04:08:00+5:302021-02-09T04:08:00+5:30

पालिका अतिरिक्त आयुक्तांचे संकेत; नायर रुग्णालयात टोचून घेतली काेराेनाची लस लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सामान्यांसाठी लोकल सेवा सुरू ...

Local's current schedule will change in 15 days! | लोकलचे सध्याचे वेळापत्रक १५ दिवसांनी बदलणार!

लोकलचे सध्याचे वेळापत्रक १५ दिवसांनी बदलणार!

googlenewsNext

पालिका अतिरिक्त आयुक्तांचे संकेत; नायर रुग्णालयात टोचून घेतली काेराेनाची लस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सामान्यांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यापासून आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास येत्या १५ दिवसांनंतर लोकलचे सध्याचे वेळापत्रक बदलण्याचा विचार करू, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. त्यांनी सोमवारी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील लसीकरण केंद्रात लस टोचून घेतली. त्या वेळी प्रसारमाध्यमांना त्यांनी ही माहिती दिली.

प्रमुख रुग्णालयांसह एकूण २१ केंद्रांवर ‘कोविड १९’ लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र कोणत्याही केंद्रावर जाऊन लस घेण्याची सवलत, समुपदेशन यामुळे आता ७० ते ८० टक्के कर्मचारी लस घेण्यासाठी केंद्रावर हजेरी लावत आहेत.

आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोविड आघाडीवर कार्यरत इतर सेवकांचे (फ्रंटलाइन वर्कर्स) लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त काकाणी यांना साेमवारी लस देण्यात आली. लसीकरणासाठी आवश्यक साठा उपलब्ध असून टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरळीत सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

* ७५ हजार जणांना लस

पालिकेला आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये मिळून दोन लाख ६५ हजार लसींचा साठा मिळाला आहे. पहिला आणि दुसरा टप्पा मिळून आतापर्यंत ७५ हजार ७५१ जणांना लस देण्यात आली आहे. यात ७२ हजार ३८८ आरोग्य कर्मचारी तर तीन हजार ३६३ फ्रंटलाइन वर्कर्स यांचा समावेश आहे.

* परिस्थिती नियंत्रणात, पण सावध राहा!

मुंबईत लोकल सेवा सुरू झाल्यानंतरही गेल्या आठवडाभरात कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. हे चित्र दिलासादायक असले तरी कोरोना आटोक्यात येत आहे, म्हणून गाफील राहून चालणार नाही. मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या निर्देशांचे पालन करणे यापुढेही आवश्यक असल्याचे काकाणी यांनी सूचित केले. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाल्यानंतर पात्र व्यक्तींनी लस घ्यावी. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आवाहनही त्यांनी केले.

* शाळांबाबत १५ दिवसांत निर्णय

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत एका रुग्णालयात चाचण्या करण्यात येत आहेत. जन्माला आलेल्या नवजात शिशूच्या प्रतिजैविकांबाबत तपासण्या केल्या जात आहेत. लोकल सर्वांसाठी सुरू करून एक आठवड्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र सुदैवाने रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे एकूण १५ दिवसांत रुग्णसंख्येत वाढ न झाल्यास मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

..................................

Web Title: Local's current schedule will change in 15 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.