एक्स्प्रेसमधून ‘लोकल’चा फज्जाच
By Admin | Published: March 29, 2016 02:20 AM2016-03-29T02:20:46+5:302016-03-29T02:20:46+5:30
सकाळच्या वेळेत लोकलमधील गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी लोकल प्रवाशांना तीन एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची दिलेली मुभा तोट्याची ठरत असून, या योजनेतून दोन
मुंबई : सकाळच्या वेळेत लोकलमधील गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी लोकल प्रवाशांना तीन एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची दिलेली मुभा तोट्याची ठरत असून, या योजनेतून दोन महिन्यात रेल्वेला केवळ १,६०० रुपयांचीच कमाई झाली आहे.
डोंबिवलीकर भावेश नकाते या तरुणाचा सकाळच्या वेळेस गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेची दखल घेत मध्य रेल्वेने सकाळच्या वेळेस सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेसमधून लोकल प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वे मंत्रालयाकडून तशी मंजुरी घेतली. त्यानुसार २६ जानेवारी २0१६ पासून महालक्ष्मी एक्स्प्रेस, देवगिरी आणि लातूर एक्स्प्रेसमधून प्रवासाची लोकल प्रवाशांना मुभा देण्यात आली.
प्रवासाचे तिकीट आकारण्यासाठी एकूण दहा आणि २५ चे कूपन्स असलेले एक बुकलेट अशाप्रकारे जानेवारीत ४५0 आणि फेब्रुवारीत ४५0 बुकलेट छापण्यात आले.
या बुकलेटची छपाई करतानाच मध्य रेल्वेने या तीनही ट्रेनमध्ये मिळून जवळपास १८ टीसीही तैनात केले. मात्र, या योजनेला प्रवाशांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही आणि दोन महिन्यांत केवळ आठ बुकलेट विकले गेले. यातून फक्त १,६00 रुपये उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले. त्यामुळे हा प्रयोग खर्चीक आणि मनस्ताप ठरत असून त्यावर पुढील महिन्यात अंतिम निर्णय होणार आहे.
सोय की मनस्ताप?
ठाणे आणि कल्याण स्थानकातून या तीन एक्स्प्रेसधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली आहे. परंतु एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या प्रवाशांची घाई आणि एक्स्प्रेसचे दरवाजे अरुंद असल्याने ट्रेनमधून उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होतो. त्यामुळेही लोकल प्रवासी याकडे पाठ फिरवत असतील, असा अंदाज रेल्वेकडून व्यक्त करण्यात आला आहे.