लोकलच्या ‘गारव्या’ने मुंबईकर सुखावले, एसी लोकल धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:13 AM2017-12-26T06:13:55+5:302017-12-26T06:14:10+5:30
मुंबई : ‘ती’ येथेच येईल...‘ती’ बघ... अरे ‘ती’ आली... ‘एसी लोकल’ अशी उत्सुकता बोरीवली फलाट क्रमांक ९वरील प्रवाशांमध्ये नाताळच्या मुहूर्तावर दिसून आली.
मुंबई : ‘ती’ येथेच येईल...‘ती’ बघ... अरे ‘ती’ आली... ‘एसी लोकल’ अशी उत्सुकता बोरीवली फलाट क्रमांक ९वरील प्रवाशांमध्ये नाताळच्या मुहूर्तावर दिसून आली. देशातील पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर सोमवारी सकाळी साडे दहा वाजता धावली. ‘भारतमाता की जय... हिप हिप हुर्रे...’ अशा घोषणांच्या सलामीत वातानुकूलित लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या वेळी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता उपस्थित होते. चर्चगेट येथे उतरताना प्रवाशांच्या तोंडी ‘लोकलमधील गारवा’ हाच विषय होता.
रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार, सोमवारी मुंबई सेंट्रल येथून दुपारी २ वाजून १० मिनिटांनी वातानुकूलित लोकल धावणार होती. मात्र सायंकाळी अचानक पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या वेळापत्रकात बदल केला. त्यानुसार सोमवारी सकाळी १०.३० मिनिटांनी पहिली वातानुकूलित लोकल बोरीवली-चर्चगेट मार्गावर धावली. वेळापत्रकात रात्री उशिरा बदल झाला तरी प्रवाशांच्या उत्साहात कोणताच बदल झालेला दिसला नाही. चर्चगेट दिशेने बोरीवली फलाटावर लोकल दाखल झाली. एसी लोकलचे स्वागत करणाºया अतिथींसाठी विशेष रंगमंचाची उभारणी केली होती. मात्र एसी लोकल फलाटावर येताच प्रवाशांनी एकच जल्लोष केला. पहिल्या एसी लोकलसह ‘सेल्फी’ घेण्याचा मोह प्रवाशांसह नेतेमंडळींनादेखील आवरता आला नाही. देशातील पहिली एसी लोकल चालवण्याचा मान मोटारमन शैलेश गेडाम यांना मिळाला. तर गार्डची जबाबदारी जगन्नाथ यांनी पेलली. तर पहिला प्रवासी तिकिटाचा मानकरी बोरीवलीकर धीरेंद्र त्रिपाठी होता.
>किंमत ५४ कोटी
आंतरराष्ट्रीय बाजारात वातानुकूलित लोकलच्या एका बोगीसाठी १० कोटी रुपये मोजावे लागतात. परिणामी, एक वातानुकूलित रेकची किंमत १२० कोटींच्या घरात जाते. चेन्नईच्या आयसीएफमध्ये ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पांतर्गत या लोकलची बांधणी करण्यात आली. यामुळे १२ बोगींच्या एका रेकला ५४ कोटी रुपयांची खर्च आला.
>सर्वसामान्यांचा प्रवास गर्दीचाच
मार्ग एसी लोकल नॉन एसी लोकल
चर्चगेट-विरार सकाळी ८.५४ सकाळी ८.३३ त्यानंतर ९.०३
चर्चगेट-विरार सकाळी ११.५० सकाळी ११.२७ त्यानंतर १२.०६
चर्चगेट-विरार दुपारी २.५५ दुपारी २.५० त्यानंतर ३.०२
चर्चगेट-विरार रात्री ७.४९ रात्री ७.४० त्यानंतर ७.५६
विरार-चर्चगेट सकाळी १०.२२ सकाळी १०.१५ त्यानंतर १०.३९
विरार-चर्चगेट दुपारी १.१८ दुपारी १.०५ त्यानंतर १.२५
विरार-चर्चगेट दुपारी ४.२२ दुपारी ४.०८ त्यानंतर ४.३३
विरार-चर्चगेट रात्री ९.२४ रात्री ९.१९ त्यानंतर ९.२८
>प्रवाशांनो, हरकती-सूचना नोंदवा!
पहिल्या दिवशी एसी लोकलच्या सर्व फेºयाअंती आढावा घेण्यात येणार आहे. यात प्रवाशांना सूचना व हरकती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच प्रवाशांनुरूप योग्य ते बदल करण्यात येतील. या बदलात सीसीटीव्हींसह अन्य सुरक्षात्मक उपायांची तरतूद करण्यात येईल.
- ए. के. गुप्ता, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक.
>दंडावरदेखील ‘जीएसटी’
बोरीवली-चर्चगेट मार्गादरम्यान धावणाºया एसी लोकलमध्ये पहिल्याच दिवशी विनातिकीट प्रवासी पकडण्यात तिकीट तपासनिसांना यश आले. या प्रवाशांकडून ४३५ रुपयांची दंडात्मक रक्कम स्वीकारण्यात आली. यात १६५ रुपये मूळ भाडे, दंड २५० रुपये, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर १० रुपये आणि राज्य वस्तू व सेवा कर १० रुपये असे एकूण ४३५ रुपयांचा दंड आकारण्यात आला.
>दादरमध्ये महिला ‘सेल्फी’त गुंग
दादर स्थानकात एसी लोकल आल्यानंतर महिला प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रथम दर्जा पासधारक असलेल्या महिलांनी सर्वप्रथम लोकलमधील प्रवाशांना आणि सुरक्षा रक्षकांना आम्हाला प्रवास करण्याची परवानगी आहे का? आम्ही प्रवास करू शकतो का? असे प्रश्न विचारले. लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळताच, महिला मंडळांनी लोकलमध्ये सेल्फी काढण्यास सुरुवात केली.
>पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद : पहिल्या दिवशी एसी लोकलच्या ५ फेºयांमधून एकूण ४४६ तिकिटांची विक्री झाली. एसी लोकल तिकिटाच्या विक्रीतून ६२ हजार ७४६ रुपयांची कमाई पश्चिम रेल्वेने केली. वातानुकूलित लोकलमध्ये १०२८ आसने असून, एकूण प्रवासी क्षमता ५,९६४ इतकी आहे. नाताळची सुट्टी असल्यामुळे पहिल्याच दिवशी लोकलच्या प्रतिसादाबाबत बोलणे योग्य राहणार नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
>फेºया वाढविणे गरजेचे
देशातील पहिल्या वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करणे हा अनुभव सुखद आहे. लोकल फेºयांची संख्या सध्या खूप कमी आहे. त्यामुळे फेºयांची संख्या वाढल्यानंतर खºया अर्थाने मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखद होईल. बोरीवली-चर्चगेट प्रवासादरम्यान भाडे जास्त आहे. मात्र, लोकलमधील सुविधा आणि वातानुकूलित यंत्रणा पाहता भाडे योग्य आहे.
- सुनील आणि नीता भंडारी,
एसी लोकलचे प्रवासी (पती-पत्नी).
>गार्डची भूमिका निर्णायक
एसी लोकलचा गार्ड म्हणून काम करण्याची संधी मिळणे ही कौतुकास्पद बाब आहे. इतर लोकलमध्ये आणि एसी लोकलमध्ये गार्ड म्हणून काम करणे यात खूप मोठा फरक आहे. एसी लोकलचे दरवाजे बंद झाल्याशिवाय लोकल चालू शकत नाही. तसेच दरवाजे उघडण्याचे कामही गार्डलाच करायचे असल्याने, गार्डची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
- पी. जगन्नाथन, गार्ड,
एसी लोकल.
>२ महिला आणि १० पुरुष आरपीएफ
वातानुकूलित लोकलचे दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे, प्रवाशांच्या सोईसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली. प्रत्येक बोगीत एक सुरक्षा रक्षक तैनात होता. रेल्वे सुरक्षा बलातर्फे सोमवारी २ महिला सुरक्षा रक्षक आणि १० पुरुष जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. भविष्यात एका बोगीत २ सुरक्षा रक्षक असतील, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलातर्फे देण्यात आली.
>...आणि तिकीट मिळाले
सकाळी ९ वाजता तिकीट केंद्रावर आलो. या वेळी मात्र, संबंधित कर्मचाºयांनी तिकीट विक्री सुरू झाली नाही, असे सांगितले. या संबंधी स्टेशन मास्तरची भेट घेतली. त्यांनी सांगितल्यानंतर वातानुकूलित लोकलचे पहिले प्रवासी तिकीट मला मिळाले.
- धीरेंद त्रिपाठी, एसी लोकलचा
पहिला तिकीटधारक