लोकलमध्ये विसरलेले दागिने सापडले
By admin | Published: June 14, 2015 12:42 AM2015-06-14T00:42:34+5:302015-06-14T03:52:36+5:30
शहरात बंद घरे फोडून चोर दागिने घेऊन पसार होतात, या भीतीने दोन लाखांचे दाग-दागिने सोबत घेऊन बदलापूरमधले एक वयोवृद्ध दाम्पत्य नातेवाइकाच्या घरी पूजेला निघाले.
मुंबई: शहरात बंद घरे फोडून चोर दागिने घेऊन पसार होतात, या भीतीने दोन लाखांचे दाग-दागिने सोबत घेऊन बदलापूरमधले एक वयोवृद्ध दाम्पत्य नातेवाइकाच्या घरी पूजेला निघाले. मात्र घाईत दागिन्यांची पिशवी लोकलमध्येच विसरले. कांजूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. मदतीसाठी त्यांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. रेल्वे पोलिसांनीही मग वेगाने हालचाली करत या दाम्पत्याचे दागिने चोरी होण्यापूर्वी हस्तगत केले. दागिने मिळाल्यानंतर या दाम्पत्याने पोलिसांचे आभार मानले.
राजगोपाल अय्यर (६४) आणि त्यांची पत्नी स्मती (६०) कांजूरमार्गला राहणाऱ्या नातेवाइकाच्या घरी जाणार होते. घरातून बाहेर पडताना त्यांनी सर्व दागिने एका पिशवीत गुंडाळून सोबत घेतले. शनिवारी पहाटे ६.१४ची बदलापूर-सीएसटी लोकल पकडून त्यांनी प्रवास सुरू केला. राजगोपाल फर्स्ट क्लासमध्ये बसले तर स्मती सेकंड क्लास डब्यात बसल्या होत्या. दागिन्यांची पिशवी राजगोपाल यांच्याकडे होती. ती त्यांनी रॅकवर ठेवली. पुढे ते ही पिशवी विसरून कांजूरमार्ग स्थानकात उतरले. सेकंड क्लासमधून उतरून त्यांच्याजवळ आलेल्या पत्नीने त्यांना दागिन्यांच्या पिशवीची आठवण करून दिली. तोपर्यंत लोकल सुटली होती.
दागिने लोकलमध्येच राहिल्याने हे वृद्ध दाम्पत्य गर्भगळीत झाले. त्यांनी त्याही अवस्थेत स्थानकावरील रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. राज्य रेल्वे पोलीस दलाचे शिपाई सुभाष बाजीराव नांदे यांनी या प्रकरणी रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर याची माहिती दिली. हेल्पलाइनने तत्काळ सीएसटी पोलीस स्टेशनला माहिती दिली. सीएसटीचे स.पोलीस उपनिरीक्षक राजू लक्ष्मण मकरे व पोलीस शिपाई योगेश घनश्याम तेली यांनी भायखळा रेल्वे स्थानकात सदर लोकलचा फर्स्ट क्लासचा डबा तपासला. त्यात अय्यर यांची दागिन्यांची पिशवी त्यांच्या हाती लागली. दागिने परत मिळाल्याची माहिती अय्यर दाम्पत्याला समजताच त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले. (प्रतिनिधी)