मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई उपनगरीय लोकलमध्ये सुधारणांची गरज असून, एसी लोकल अत्यावश्यक असल्याचे मत जागतिक बँकेकडून व्यक्त करण्यात आले. जागतिक बँकेचे वरिष्ठ अधिकारी हे मंगळवारी मुंबई दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवाशांशी संवाद साधला. तसेच चर्चगेट ते अंधेरी असा लोकल प्रवासही केला. एसी लोकलबरोबरच अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजेही आवश्यक असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना वर्ल्ड बँकेकडूनही निधी उपलब्ध होतो. एमयूटीपी-१, एमयूटीपी-२मधील प्रकल्पांना निधी उपलब्ध केलेला आहे. त्याचप्रमाणे एमयूटीपी-३मधील नव्या प्रकल्पांनाही वर्ल्ड बँकेकडून निधी उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार, रेल्वे प्रशासनाशी वर्ल्ड बँकेची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीला वर्ल्ड बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुलायनी इंद्रावती, भारतातील वर्ल्ड बँकेचे संचालक आॅनो रुल, दक्षिण आशियाचे उपाध्यक्ष अॅने डिक्सन, एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय उपस्थित होते. या बैठकीनंतर वर्ल्ड बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चगेट ते अंधेरी असा लोकल प्रवास केला. वर्ल्ड बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक इंद्रावती मुलायनी यांनी महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी महिला प्रवाशांची मते जाणून घेतली. स्वयंचलित दरवाजाविषयी प्रवाशांना विचारले असता, डबा अधिकच बंदिस्त होत गर्दीच्या वेळी होणाऱ्या अडचणीचा मुद्दा मांडला. मात्र लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंचलित दरवाजे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर मुंबईचा आणि खासकरून लोकल सेवेचा विकास करण्यासाठी एसी लोकलचीही गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी भरीव गुंतवणुकीसह मुंबईतील पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मुल्याणी इंद्रावती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा केली. शेतीचा कायापालट करू शकणाऱ्या योजना भविष्यातही प्राधान्याने राबविण्यात येणार असून, यासाठी जागतिक बँकेचे सहकार्य अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या वेळी स्मार्ट सिटी अभियान व अमृत योजनेविषयी माहिती देण्यात आली. मुंबई महानगर विभागीय विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेल्या मुंबई मेट्रोसह इतर प्रकल्पांबाबतही चर्चा करण्यात आली. श्रीमती इंद्रावती म्हणाल्या, मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात दीर्घकालीन प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून सहकार्य करण्यात येईल. मेट्रो प्रकल्पासाठी सहकार्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. मुंबईतील सार्वजनिक परिवहन यंत्रणेत सुधारणा करण्यासाठीही या शिष्टमंडळाने मदतीची तयारी दर्शवली आहे. या शिष्टमंडळात जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाच्या उपाध्यक्षा अनेटी डिक्सॉन, भारतातील राष्ट्रीय संचालक ओन्नो रु हल, वरिष्ठ अधिकारी मंदाकिनी कौल, वरिष्ठ संपर्क अधिकारी अतुल अगरवाल, व्यवस्थापकीय संचालकांचे संपर्कसल्लागार नटालिया सिडलीक, व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार डेव्हीड सेठ वॉरेन आदींचा समावेश होता. या वेळी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते. वक्तशीरपणात सुधारणांची गरजउपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यांना चांगली सेवा देणे गरजेचे असून, त्यात बदल होणे आवश्यक असल्याचे जागतिक बँकेचे भारतातील शहरी संचालक आॅनो रुल यांनी सांगितले. यात खासकरून लोकलच्या वक्तशीरपणात सुधारणा झाली पाहिजे आणि त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. लोकल विकासाची ठेवण्यात आलेली उद्दिष्टे : सर्व मार्गावरील नऊ डब्यांच्या गाड्या बारा डब्यांपर्यंत नेणे, लोकलचा प्रवास कालावधी २.५ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी करणे, ऐन गर्दीच्या वेळेस प्रत्येक तासात सुटणाऱ्या १४.४ हे गाड्यांचे प्रमाण वाढवून प्रति तासापर्यंत १७ ते १८ लोकलपर्यंत वाढवणे. नव्या लोकलचा समावेश.
लोकलला स्वयंचलित दरवाजे आवश्यक
By admin | Published: September 23, 2015 1:58 AM