मुंबई- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (क्रॉफर्ड मार्केट) येथील मच्छी विक्रेते अनधिकृतपणे ऐरोली/मुलुंड पूर्व (ऐरोली टोल नाका) येथील जकात नाक्याच्या मोकळ्या भूखंडावर मासे विक्रीचा व्यवसाय करत आहेत. यामुळे नवी मुंबई व मुलुंड येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कोळी मच्छीमार बांधवांच्या मासे विक्रीच्या व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. या अनधिकृतपणे होत असलेल्या मासे विक्रीमुळे नवी मुंबईतील कोळी मच्छीमार बांधवांच्या व भगिनींच्या मासे विक्री च्या व्यवसायावर मंदीचे सावट आले असून तेथील स्थानिक भूमिपुत्रांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नवी मुंबईतील सर्व कोळी मच्छीमार बांधवांचा व भगिनींचा ऐरोली जकात नाका येथे होत असलेल्या मासे विक्री व्यवसायाला प्रचंड विरोध आहे.
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांच्या निवासस्थानी नवी मुंबईतील कोळी मच्छीमार बांधवांची बैठक घेण्यात आली. यावेळी मच्छीमार बांधवांनी ऐरोली जकात नाका येथे चालू असलेली मासे विक्री तात्काळ बंद झाली पाहिजे अशी मागणी केली. या ठिकाणी होत असलेल्या मासे विक्रीमुळे आमचे खूप आर्थिक नुकसान होत आहे. आधीच कोरोना, तौक्ते, निसर्ग चक्रीवादळामुळे मच्छिमार बांधवांचा मच्छीमार व्यवसाय आधीच संकटात सापडला आहे. यामुळे ही मासे विक्री अशीच चालू राहिली तर आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ येईल अशा भावना नवी मुंबईतील अनेक कोळी मच्छीमार बांधवांनी आमदार रमेश पाटील यांच्यासमोर व्यक्त केल्या.
क्रॉफर्ड मार्केटमधील 99% मच्छी विक्रेत्या बांधवांचा व भगिनींचा ऐरोली येथे मच्छी विक्री करण्यासाठी यायला विरोध आहे. मुंबई मध्येच जवळच्या ठिकाणी आम्हाला मासे विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची मागणी असून ऐरोली येथे मासे विक्रीसाठी आलेल्या कित्येक मच्छीमारांचा क्रॉफर्ड मार्केटशी संबंध नसल्याचे आमदार रमेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी कोळी महासंघ नवी मुंबईतील मासे विक्री करणाऱ्या कोळी बांधवांच्या व भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असे आश्वासन आमदार रमेश पाटील यांनी दिले आहे. अनधिकृतपणे घुसखोर लोकांच्याकडून होत असलेल्या मच्छी विक्रीच्या व्यवसायामुळे याठिकाणी स्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे व रस्त्यावर ट्राफिकची समस्या निर्माण होत असल्याने या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्यामुळे खूप त्रास होत आहे. तसेच ऐरोली टोल नाक्याजवळील जकात नाका येथे मासे विक्री करण्यासाठी पोलीस प्रशासनाची व महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अनधिकृतपणे सुरू असलेली मासेविक्री तात्काळ शासनाने बंद केली नाही तर सर्व कोळी समाज रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गाने मोठे आंदोलन करेल असा इशारा आमदार रमेश पाटील यांनी दिला.