Join us

देवनार येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, नागरी सुविधांवर ताण पडण्याची भीती : स्थानिकांचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 15:21 IST

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाच दुसरीकडे सुविधा मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कचऱ्यापासून  वीजनिर्मिती प्रकल्प तसेच धारावीकरांचे पुनर्वसनही येथे  होणार असल्याने नागरी सुविधांवर ताण पडणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वीजनिर्मिती प्रकल्प बंद करावा व धारावीकरांचे पुनर्वसन येथे करू नये, यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना अस्थमा, डोळे जळजळणे, श्वसनाचा त्रास, त्वचारोग, आदी आजारांचा सामना करावा लागत आहे. वीजनिर्मिती प्रक्रियेमुळे होणाऱ्या प्रदूषणाचाही त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. देवनार परिसरात सुविधांच्या नावाखाली उदासीनता आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी आहे. ठिकठिकाणी उघडी गटारे, अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहे. मात्र, पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा स्थानिकांचा आरोप आहे.

डम्पिंग ग्राऊंड येथील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ३०  फूट डीपी रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. शिवाय धारावीकरांचे पुनर्वसन करण्यासाठी १२४ एकर जागा अदानी कंपनीला देण्यात आली आहे.  परिणामी नागरी सुविधांवर ताण वाढण्याची शक्यता आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

डम्पिंग तसेच वीज निर्मिती प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडीमधील नागरिकांच्या बाबतीत वैद्यकीय सुविधांचा अभाव असून, पाणीटंचाई, सार्वजनिक शौचालयांच्या सुविधांची वानवा आहे. या ठिकाणी कोणताही नवीन प्रकल्प आणण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना सुविधा देण्यात याव्यात. सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णालय बांधण्यात यावे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी.- संजय दिना पाटील, खासदार, उद्धवसेना 

टॅग्स :मुंबई