अनधिकृत मासेविक्रीला स्थानिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:08 AM2021-08-13T04:08:48+5:302021-08-13T04:08:48+5:30
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई येथील मासळी विक्रेते अनधिकृतपणे ऐरोली/मुलुंड पूर्व (ऐरोली टोल नाका) येथील जकात नाक्याच्या ...
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई येथील मासळी विक्रेते अनधिकृतपणे ऐरोली/मुलुंड पूर्व (ऐरोली टोल नाका) येथील जकात नाक्याच्या मोकळ्या भूखंडावर मासेविक्रीचा व्यवसाय करत आहेत. यामुळे स्थानिक भूमिपुत्र मच्छीमार बांधवांच्या मासेविक्रीच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. या अनधिकृत मासेविक्रीमुळे नवी मुंबईतील मासेविक्रीच्या व्यवसायावर मंदीचे सावट असून याने तेथील स्थानिक भूमिपुत्रांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचमुळे जकात नाका येथे होत असलेल्या मासेविक्री व्यवसायाला प्रचंड विरोध आहे.
याबाबत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार रमेश पाटील यांच्या निवासस्थानी नवी मुंबईतील कोळी मच्छीमार बांधवांची बैठक घेण्यात आली. यावेळी मच्छीमार बांधवांनी ऐरोली जकात नाका येथे चालू असलेली मासेविक्री तत्काळ बंद झाली पाहिजे, अशी मागणी केली. या ठिकाणी होत असलेल्या मासेविक्रीमुळे आमचे खूप आर्थिक नुकसान होत आहे. आधीच कोरोना, तौक्ते, निसर्ग चक्रीवादळामुळे मच्छीमार बांधवांचा मासळीचा व्यवसाय आधीच संकटात सापडला आहे. यामुळे ही मासेविक्री अशीच चालू राहिली तर आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशा भावना नवी मुंबईतील अनेक कोळी मच्छीमार बांधवांनी आमदार रमेश पाटील यांच्यासमोर व्यक्त केल्या.
यावेळी कोळी महासंघ नवी मुंबईतील मासेविक्री करणाऱ्या कोळी बांधवांच्या व भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असे आश्वासन आमदार रमेश पाटील यांनी दिले आहे. अनधिकृतपणे घुसखोर लोकांकडून होत असलेल्या मासेविक्रीच्या व्यवसायामुळे या ठिकाणी स्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे व रस्त्यावर ट्रॅफिकची समस्या निर्माण होत असल्याने या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्यामुळे खूप त्रास होत आहे. तसेच ऐरोली टोलनाक्याजवळील जकात नाका येथे मासेविक्री करण्यासाठी पोलीस प्रशासनाची व महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अनधिकृतपणे सुरू असलेली मासेविक्री तत्काळ शासनाने बंद केली नाही तर सर्व कोळी समाज रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गाने मोठे आंदोलन करेल असा इशारा आमदार रमेश पाटील यांनी दिला.