पार्किंग, समस्यांविरोधात स्थानिकांनी उठवला आवाज; पूर्व उपनगरातील मैदाने खेळासाठी खुली
By सचिन लुंगसे | Updated: December 23, 2024 11:23 IST2024-12-23T11:22:47+5:302024-12-23T11:23:22+5:30
घाटकोपर परिसरातही खेळाची चांगली मैदाने असून, स्थानिकांनी त्याची निगा राखली आहे.

पार्किंग, समस्यांविरोधात स्थानिकांनी उठवला आवाज; पूर्व उपनगरातील मैदाने खेळासाठी खुली
मुंबई :मुंबईच्या पूर्व उपनगरातील अनेक मैदाने वाचविण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत तेथील अतिक्रमणे, समस्यांच्या विरोधात पोलिस, पालिकेच्या दरबारी आवाज उठवला. त्यामुळे या मैदानांनी मोकळा श्वास घेतला असून, त्याचा वापर खेळासाठी करता येऊ लागल्याने रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कुर्ला पश्चिमेतील गांधी मैदान गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले होते. त्याविरोधात स्थानिक रहिवासी आणि समाजसेवकांनी कित्येक वर्षे आवाज उठवला, पोलिस ठाण्यापासून मुंबई महापालिकेच्या कार्यालयापर्यंत चकरा मारल्या. मात्र, काही केल्या मैदान मोकळे होत नव्हते. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये लोकप्रतिनिधींसोबत महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या बैठकांनंतर गांधी मैदानाने आता मोकळा श्वास घेतला आहे. हे मैदान बऱ्यापैकी विकसित झाले असून, त्याचा स्थानिकांना चांगला फायदा होत आहे. त्याचबरोबर कुर्ला पश्चिमेतील वाडिया इस्टेट परिसरात इमारत क्रमांक १७ च्या समोरील मैदानात गेल्या कित्येक वर्षांपासून अवजड तसेच छोटी-मोठी वाहने उभी केली जात होती. दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेला वाहने उभी केली जात असल्याने मैदान खेळासाठी आहे की पार्किंगसाठी? असा प्रश्न स्थानिकांना पडला होता. काही केल्या त्यावर मार्ग सापडत नसतानाच स्थानिकांनी एका लोकप्रतिनिधीची मदत घेत मैदानाला कुंपण घातले आणि मैदान विकसित केले. आता या मैदानात गाड्या उभ्या राहत नाहीत. लहान मुलांसोबत मोठ्या व्यक्तींनादेखील मैदानाचा वापर करता येत आहे.
घाटकोपरमध्ये स्थानिकांकडून निगा
घाटकोपर परिसरातही खेळाची चांगली मैदाने असून, स्थानिकांनी त्याची निगा राखली आहे.
कुर्ला पूर्वेतील नेहरूनगर परिसरातील मैदानात बऱ्यापैकी मोकळी जागा असल्याने तरुणांना क्रिकेट व इतर खेळ खेळता येत आहेत.
गोवंडी, मानखुर्दमध्ये गैरसोयींचे मैदान
गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि मैदानात बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. माती नाही.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून मैदानाची काळजी घेतली जात नाही. शिवाय, रात्री-अपरात्री येथे समाजकंटकांकडून मद्यपान- देखील केले जाते, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.