Join us

अनधिकृत शिधावाटप दुकानाला कुलूप

By admin | Published: July 28, 2014 2:07 AM

मुलुंड (पू़) येथे अनधिकृतरीत्या थाटलेल्या शिधावाटप दुकानाला शिधावाटप कार्यालयाने कुलूप ठोकले असून, याबाबत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई : मुलुंड (पू़) येथे अनधिकृतरीत्या थाटलेल्या शिधावाटप दुकानाला शिधावाटप कार्यालयाने कुलूप ठोकले असून, याबाबत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल कांबळे यांनी या अनधिकृत दुकानाचा पर्दाफाश करीत या दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली होती. हे दुकान पूर्वी मुलुंड (पू़) भागातील आंबेडकर नगर येथे होते. मुलुंड उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिक्रमण आणि निष्कासन विभागाने २0 मे २0१४ रोजी ३३/३८ अन्वये करण्यात आलेल्या निष्कासनाच्या कारवाईत इतर झोपड्यांसह हे दुकानही जमीनदोस्त केले होते. त्यानंतर या दुकानाचा मालक कवलराम जैसवाल याने शिधावाटप नियंत्रक विभागाची परवानगी न घेता ते दुकान नवघर गल्ली क्रमांक १ येथे स्थलांतरित केले. दुकान दूरच्या ठिकाणी स्थलांतरित झाल्याने येथील ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. दुकानाची आवश्यक परवानगी नसल्याने शिधावाटप नियंत्रक विभागाने २४ जुलैला रात्रभर कारवाईची प्रक्रि या पूर्ण करून २५ जुलैला सकाळी दुकानाला सील ठोकले. दुकान निलंबित केले. या दुकानाच्या गैरव्यवहाराप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दुकानाचा परवाना निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आल्याची माहिती परिमंडळ ‘ई’चे उपनियंत्रक मधुकर बोडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)