Lockdown: आता विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई; मुंबई पोलिसांकड़ून बंदोबस्तात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:49 AM2020-06-29T02:49:26+5:302020-06-29T07:05:26+5:30
अंमलबजावणी सुरू : दोन किमी परिघाची अट
मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राहत्या ठिकाणांपासून २ किमीच्या परिसराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. त्याची रविवारपासून अंमलबजावणीही सुरू केली आहे.
मुंबईत लॉकडाऊन शिथिल केल्याने नागरिकांचा वावर वाढला. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई पोलिसांकड़ून कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उपनगरात कारवाई सुरू होती. आता संपूर्ण मुंबईत कारवाईचा वेग वाढवला आहे.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नियमावलीनुसार, अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, तसेच घराबाहेर फिरताना चेहºयावर मास्क लावणे अनिवार्य आहे. घरापासून फक्त २ कि.मी.च्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाण्यास परवानगी आहे. त्यामुळे २ किमीच्या बाहेर जाऊ नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. तसेच व्यायामाची परवानगी घरापासून २ किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे. कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत २ कि.मी. च्या बाहेर जाण्याची परवानगी आहे. यासह सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले.
मुंबईत रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू
मुंबईत रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला असून, यामध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कारवाई केली जाईल. विनाकारण फिरणाºयांची वाहनेही जप्त केली जाणार आहेत.
मुंबईत शनिवारपर्यंत १९,६३८ जणांविरुद्ध १० हजार ३७१ गुन्हे
नोंद करण्यात आले आहेत. तर ११,७५१ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ६०३० तर अवैध वाहतूक प्रकरणी १४३३ गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर मास्क न वापरल्याप्रकरणी १८७७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.