मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातल्या प्रमुख देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असले तरी एमएमआरडीएने आपले २६ वेगवेगळ््या देशांत असलेले सल्लागार आणि कंपन्यांशी सल्लामसलत सुरू ठेवली आहे. गेल्या दहा दिवसांत अनेक प्रस्तावीत योजनांचे आराखडे अंतिम करण्यात आले. तर, काही महत्वाकांक्षी योजनांच्या नियोजनासाठी साधकबाधक े चर्चाही सुरू असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
एमएमआरडीएने आपल्या योजना कार्यान्वीत करण्यासाठी जवळपास १२ वेगवेगळ््या देशांचे सल्लागार नियुक्त केले आहेत. त्याशिवाय या कामांच्या पुर्ततेसाठी त्यांना आणखी किमान १४ देशांमधिल विविध कंपन्यांशी व्यवहार करावे लागतात. यापैकी प्रमुख देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने सुरू असून तिथले व्यवहारही भारताप्रमाणचे बंद झाले आहेत. एमएमआरडीएसह या कंपन्यांचे कार्यालयीन कामकाज बंद असले तरी वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून संबंधित अधिकारी या परदेशी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सातत्याने चर्चा करत आहेत. लाईफ साईझ या आॅनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सींग लिंकचा आधार त्यासाठी घेण्यात आला आहे. तसेच, ज्या देशांमध्ये या लिंकची सेवा उपलब्ध नाही तिथे स्काईपच्या माध्यमातून मिटिंग होतात. काही योजनांच्या आर्थिक मुद्यांवरील चर्चा पूर्ण करण्यात आली आहे. तर मेट्रो प्रकल्पातील साईनेज, एकात्मीक तिकिट प्रणालीच डिझाईन, विरार अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या पाचव्या पॅकेजचे नियोजन यांसारखी अनेक कामे या काळात मार्गी लागल्याची माहिती सह आयुक्त बी. जी. पवार यांनी दिली. जिथे गोपनीयता राखणे आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार झाले आहेत तिथे आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दररोज आठ तास काम
महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक अधिका-याला कामाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. दररोज किमान सात ते आठ तास व्हीडीओ आणि आॅडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून काम सुरू असते. दर सोमवारी विभाग प्रमुखांची मिटिंग, शुक्रवारी पावसाळी कामाचा आढावा आणि इंजिनिअरींग विभागाशी चर्चा, बुधवार सोमवारी अन्य प्रकल्पांचा आढावा, गुरूवारी मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतला जातो. मेट्रो स्टेशनचे साईनेजेस अंतिम करण्यासाठी फ्रान्सच्या सिस्क्रा कंपनीच्या प्रतिनिधींशी तर सलग साडे सात कॉन्फरन्स झाल्याचेही पवार यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळातही क्वालिटी काम करता आल्याचे समाधान प्रत्येक अधिका-याला असल्याचेही त्यांनी नमुद केले.