लॉकडाऊनमध्ये देखील जीपीओ व टपाल मुख्य कार्यालये सुरु लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेले असले तरी मुंबई सीएएमटी येथील टपाल खात्याचे मुख्यालय असलेले जीपीओ व मुंबईतील टपाल खात्याची इतर मुख्य कार्यालये सुरु आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना विनाव्यत्यय एटीएम सुविधा उपलब्ध राहावी यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे स्वत: दररोज जीपीओ मधील कार्यालयात पूर्ण वेळ हजर राहून टपाल खात्याच्या कामांचे व्यवस्थापन करत आहेत. टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांना कामावर येणे शक्य होत नसल्याने शक्य आहेत तेवढ्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने काम केले जात आहे. बोरीवली चेंबूर दादर मालाड येथील टपाल मुख्य कार्यालये मंगळवारी चालू ठेवण्यात आली होती. रेल्वे व रस्ते मार्ग बंद असल्याने पत्रांची डिलिव्हरी सध्या बंद आहे. त्यामुऴे टपाल कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात नाही. दादर मध्ये मंगळवारी सुकन्या समृध्दी योजनेसाठी अर्ज देखील भरण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिली. पोस्टमन व टपाल कर्मचाऱ्यांना सँनिटायझर्स, मास्क देण्यात आले आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शक्य ती सेवा पुरवण्याचा प्रयत्न असल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनमध्ये देखील जीपीओ व टपाल मुख्य कार्यालये सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 6:27 PM