लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकार लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता आहे. पण, लॉकडाऊन जाहीर झाल्यास ऑनलाइन कंपन्यांचा फायदा होईल तर दुकानदारांचे नुकसान होईल, असा आरोप फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशने केला आहे.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह म्हणाले, लॉकडाऊन केल्यास त्याचा सर्वांत जास्त फटका मध्यमवर्गीय आणि त्याखालील वर्गाला बसणार आहे. त्यांचा रोजगार हिरावला जाणार आहे. त्यांना घरखर्च, घरभाडे आणि इतर बाबींसाठी व्यवस्था काय असणार? यावर विचार व्हावा. लॉकडाऊन आणि त्यानंतर अनलॉकमध्ये कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची खात्री नाही. त्यामुळे सरकारने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा, लसीकरण वाढवावे. जर लॉकडाऊन केले तर ऑनलाइन कंपन्यांचा फायदा होईल आणि दुकानदारांचे नुकसान होईल, असेही ते म्हणाले.