Maharashtra Lockdown: राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं लॉकडाऊनचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच दिले आहेत. पण राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं लॉकडाऊनला याआधीच विरोध केला आहे. त्यात आता सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लॉकडाऊनला विरोधे केला आहे. "राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हे सत्य आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केला आहे", असं नवाब मलिक म्हणाले.
"लॉकडाऊन राज्याला अजिबात परवडणारा नाही. तो जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे तो अंतिम पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढविण्यावर आणखी भर देण्यात यावा अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी याआधीच आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा सूचना केल्या देखील आहे. पण लोकांनीही काळजी बाळगणं आणि नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. नियम पाळले गेले तर कोरोनाचा प्रसार होणार नाही", असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
लॉकडाऊनचं नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशकोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनचं नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा, यावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या आहेत