लॉकडाऊनमुळे गणेशमूर्तिकारांसमोरील विघ्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 01:37 AM2020-07-27T01:37:20+5:302020-07-27T01:37:26+5:30
नियमावली न आल्याने द्विधा मनस्थिती ; इकोफ्रेंडली मूर्ती बुकिंगकडे ग्राहकांचा कल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाबाबत मूर्तिकारांसाठी अद्याप नियमावली जाहीर झाली नाही. त्यातच यंदा कोरोनामुळे गणेशमूर्तींना अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. तसेच मूर्ती वाहतुकीच्याही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
परदेशातच नाही तर मुंबईतही मूर्तींना यंदा मागणी नाही. या परिस्थितीमुळे यावर्षी मूर्तिकार अडचणीत आले असून आर्थिक नुकसान कसे भरून काढायचे, या संभ्रमात हे मूर्तिकार आहेत. तर यंदा गणेशोत्सव कसा साजरा करायचा, असा प्रश्न गणेशभक्तांसमोर पडला आहे.
आॅनलाइन मूर्तीची विक्री सुरू आहे. पण आॅनलाइन घेतलेल्या मूर्तीमध्ये काही बिघडले असेल तर ते कसे दुरुस्त करणार? आॅनलाइनची देवाणघेवाण गुंतागुंतीची आहे. असे चित्र सध्या दिसत आहे. अपेक्षित संख्येत मूर्ती अजूनही विक्रीसाठी बाजारात गेल्या नाहीत. दुसरीकडे मूर्तिकारांनीही यंदा ५० टक्के मूर्तीच तयार केल्या आहेत. कोरोनामुळे गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय संकटात आहे. प्रशासनाने गणेशमूर्ती आणून विकणाऱ्यांना मूर्तीविक्रीच्या स्टॉलला परवानगी दिली आहे. विक्रेत्यांना ५ टक्के फायदा मिळाला तरी ते व्यवसाय करतात. पण जे कारखानदार वर्षानुवर्षे मूर्ती बनवत आहेत, त्यांना परवानगी नाही.
कोरोनामुळे लोक संभ्रमात असून मूर्ती नोंदवण्यासाठी बाहेर येत नाहीत. जर मूर्ती घेतली तर तिचे विसर्जन कसे करायचे, हा प्रश्न लोकांना पडला आहे. त्यातच बाजारात पीओपीच्या मूर्ती जास्त आल्या आहेत. त्यासाठी कृत्रिम तलाव किती, कुठे आहेत याची माहिती नाही. प्रत्येक विभागात पाच तलाव तरी बनवले पाहिजेत. मंडळांनी आपल्या विभागात कृत्रिम तलाव तयार करावेत. त्यामुळे स्थानिकांना दूर जावे लागणार नाही. आजही काही तलावांत गेल्या वर्षीच्या मूर्ती अजून दिसतात. त्यामुळे सरकारने लवकर याबाबतची नियमावली जाहीर करायला हवी.
- सुरेश शर्मा, सचिव,
महाराष्ट्र मूर्तिकला कामगार संघटना
मी पंधरा वर्षांपासून गणेशमूर्तींची विक्री करतो. पण कोरोनामुळे ग्राहक येतील की नाही ही शंका आहे. कर्ज काढून गुंतवणूक केली आणि मूर्तींची विक्री झाली नाही तर काय करणार? त्यामुळे यावर्षी मूर्तीविक्रीसाठी आणणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. इकोफ्रेंडली मूर्ती असेल तरी जवळच विसर्जन करता येईल, म्हणून ग्राहक जास्त प्रमाणात इकोफ्रेंडली मूर्ती नोंदवत आहेत.
- हरेश नर,
गणेशमूर्ती विक्रेते, चेंबूर