लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हल्ली टीव्ही, इंटरनेट व मोबाईलच्या जमान्यात तरुणाई पुस्तकांपासून दूर जात असल्याची तक्रार ऐकायला मिळते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये तरुणाई पुन्हा एकदा वाचनाकडे वळू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आत्मचरित्र, कथा,कादंबरी, रहस्यमय व गूढ गोष्टींची तसेच राजकीय, सामाजिक, आर्थिक व अध्यात्मिक विषयावर आधारित पुस्तकांचे वाचन करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. काहीजण कविता वाचून स्वतः कविता करायला देखील शिकले आहेत. वाचन हा माणसाचा अत्यंत चांगला छंद समजला जातो.
वाचनाने ज्ञान प्राप्ती होते, कल्पनाशक्ती वाढते व विचारांच्या कक्षा देखील रुंदावतील म्हणूनच वाचन आयुष्यभर माणसाची सोबत करते.
मराठी भाषेत भरपूर साहित्य उपलब्ध असल्याने मुंबईतील मराठी तरुणाई देखील मराठी पुस्तकांचे भरपूर वाचन करत आहे. लॉकडाऊनमुळे घरात बसून रहावे लागल्याने अनेकांना वाचनाची गोडी निर्माण झाली. मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तरुणाई कोणती मराठी पुस्तके वाचत आहे. याबाबत लोकमतने तरुणाईसोबत बातचीत केली.
प्रतिक्रिया
प्रतीक्षा जरे - मला लहानपणापासूनच कवितांची आवड असल्यामुळे मी मराठीतले विविध कवी आणि कवयित्री यांच्या कविता वाचते. अनेकदा कवितेच्या दोन ओळींमध्ये देखील मोठा अर्थ लपलेला असतो. त्यामुळे कविता वाचनाने माझी विचार करण्याची क्षमता देखील वाढत आहे. यापुढे स्वतः कविता लिहिण्याचा प्रयत्न करीन.
जयेश म्हात्रे - घरामध्ये आजी आजोबांपासून वारकरी संप्रदायाचे वातावरण असल्यामुळे घरात नेहमी भजन, अभंग व कीर्तन सुरु असते. वारकरी संप्रदाय म्हटल्यावर वेगवेगळ्या संतांचे आत्मचरित्र तसेच त्यांनी लिहिलेले अभंग माझ्याकडून वाचले जातात. लॉकडाऊनमध्ये संत नामदेव, संत तुकाराम यांच्यावर भरपूर वाचन झाले.
अक्षय इनामदार - महाराष्ट्राला अनेक समाज सुधारकांचा वारसा लाभला आहे. मी स्वतः एका सामाजिक संस्थेत काम करत असल्याने सामाजिक कार्य नेमके कसे करावे यासाठी विविध समाज सुधारक आदर्श माझ्या डोळ्यासमोर असतो. कॉलेज जीवनात अशा अनेक समाज सुधारकांवर आधारित पुस्तके वाचली. आता मी संत गाडगेबाबा यांच्याविषयी वाचत आहे.
चंद्रकांत तळेकर - मी आता कॉलेजमध्ये शिकत आहे. मला पुढे जाऊन राजकारणात माझे भवितव्य घडवायचे आहे. राजकारण हा विषय डोक्यात असल्यावर माणसाने महात्मा गांधीजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा असे माझे मत आहे. त्यामुळे आता मी महात्मा गांधीजींचे चरित्र वाचत आहे त्यासोबतच त्यांच्यावर आधारित सर्व पुस्तके वाचून काढत आहे.
राज सागवेकर - शंकराबद्दल माझ्या मनात मोठी आस्था आहे. मला वाचनाची तशी विशेष आवड नाही. मात्र लॉकडाऊनमध्ये घरात बसून बराच वेळ मिळाल्याने शंकराबद्दल अधिक कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे इंटरनेट तसेच विविध पुस्तकांमध्ये शंकराविषयी जेवढे वाचायला जमेल तेवढे वाचून काढले आहे. आता शंकराव आधारित मराठी पुस्तक वाचत आहे.