ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ही साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने १२ जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन घेण्यात आला आहे. तर या कालावधीत शहरातील जांभळीनाका मार्केट आणि इंदिरा नगर भागातील मार्केट सुरु होते. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पावसाने शहराच्या विविध भागात जोरदार हजेरी लावल्याने या मुख्य बाजारपेठांमध्येही गर्दी ओसरल्याचे दिसून आले. पाऊस असल्याने नागरीकांनी देखील घराबाहेर न पडणेच पंसत केल्याचे दिसून आले. रस्त्यावरील वाहतुकीचा वेगही मंदावल्याचे दिसत होते. भर पावसातही पोलीस आयुक्तालयाअंतर्गत वाहतुक पोलीसांचा खडा पहारा असल्याचे दिसत होते. परंतु दुसरीकडे ठाण्यासह इतर काही भागांमध्ये चिकण, मटण, फिशीची विक्री सुरु असल्याचेही दिसून आले. ठाण्यात आजच्या घडीला प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ४३१६ एवढी असून मृतांचा आकडा ३३३ एवढा झाला आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी पुढील १० दिवस म्हणजे १२ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद राहणार आहे. केवळ औषधे, भाजी, किराणासारख्या अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी त्याच्या खरेदी- विकीसाठी सकाळी ८ ते सायंकाळी १ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये भाजी विक्रीसाठी सकाळी ११ तर किरणा मालासाठी १ वाजेपर्यंत तेही शहरातील मुख्य बाजारपेठेसाठीच ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर शहरातील इतर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असून किराणा मालाची दुकानेही बंद होती. पहिल्या दिवशी शहरातील जांभळीनाका आणि इंदिरा नगर मार्केटमध्ये गर्दी दिसून आली होती. परंतु दुसºया दिवशी या दोनही मार्केटमधील गर्दी देखील ओसरल्याचे दिसून आले. पावसाने सकाळपासूनच हजेरी लावल्याने या मार्केटमध्ये नागरीकांनी फिरकणे टाळले. तर शहरातील रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मात्र मंदावल्याचे दिसून आले. तर शहराच्या विविध भागात पोलीसांकडून नाकाबंदी कायम होती. अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच जाण्यासाठी परवानगी दिली जात होती. तर पेट्रोल पंपावर देखील अशांसाठीच इंधन दिले जात होते. परंतु दुसरीकडे या प्रमुख बाजारपेठा वगळता शहरातील इतर भागातील अत्यावश्यक सेवेची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली होती. याठिकाणी दुकाने सुरु ठेवणाºयांना दम देऊन ती बंद करण्याचे प्रकार सुरु होते. ठिकठिकाणी पोलिसांची कडक नाकाबंदी, शटरबंद दुकाने, ओस रस्त्यांमुळे ठाण्यात ‘करफ्यू’ सदृश्य शांतता पसरली आहे. बाजारपेठांमध्ये सकाळी तुरळक गर्दी झाली असली तरी अंतर्गत रस्तेमात्र ओस पडले होते. टीएमटीच्या बसेसमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनाच प्रवेश दिला जात होता. त्यामुळे रस्त्यावर फारशी वाहतूक दिसून आली नाही, ठाण्यात सकाळच्या सत्रामध्ये पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावरील वाहतुकही कमी झाल्याचे दिसत होते. तर काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरवात झाली होती. शासनाच्या निर्देशानुसार जीवनाश्यक वस्तूंसाठी ठाणे महापालिकेने सवलत दिली असली तरी त्याचा कुणी गैरफायदा घेणार नाही याची खबरदारीही घेतली आहे. विक्रेत्याकडे एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी जमणार नाही, दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर राहिल याकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात येणार आहे. यासाठी सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला असून रस्त्यांवरही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.फोटो - विशाल हळदे
ठाण्यात पावसामुळे लॉकडाऊन झाला यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 2:18 PM