मुंबई – राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मिशन बिगेन अगेन असं म्हणत सरकारने काही भागात नियम शिथिल केले असले तरी आजही अनावश्यकपणे लोकांची गर्दी ठिकठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे न होता त्यामध्ये ढिलाई आलेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाचं संक्रमण जलदगतीने वाढत आहे. याबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त करुन संबंधित अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला ही बाब गांभीर्याने घेऊन लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी असे आदेश दिले आहेत.
या बैठकीत खालील ६ आदेश देण्यात आले आहेत.
- प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस विभागाने कडक निर्बंध राबवावेत, प्रतिबंधात्मक क्षेत्रात होणारी नागरिकांची हालचाल, एकत्र येऊन गप्पा मारणे, पत्ते खेळणे, कोणतेही सामुहिक धार्मिक विधी, इ सर्व नागरिकांच्या एकत्रित येऊन होणाऱ्या कृती याबाबत सक्तपणे कारवाई करुन रोखण्यात याव्यात व संबंधितांवर कारवाई करावी.
- कंन्टेनमेंट झोनसाठी जबाबदार स्थानिक प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी नेमण्यात यावेत, तसेच या क्षेत्रात कम्युनिटी लीडर नेमण्यात यावेत, जेणेकरुन लोकसहभाग वाढून स्थानिक नेतृत्वाद्वारे सदर ठिकाणच्या लोकांमध्ये शिस्तीचं व नियमांचे पालन होईल याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
- कंन्टेंनमेंट झोन आणि शहरात इतर ठिकाणी पोलिसांमार्फत वाहनांची तपासणी, नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त व कोणतेही सबळ कारण नसताना दुचाकी, चारचाकी वाहनांद्वारे शहरात आणि इतरत्र फिरणाऱ्या व्यक्तींना रोखा, दुचाकीवर एकापेक्षा जास्त, रिक्षा, चारचाकीमध्ये ३ पेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करणे, तसेच तरुण मुले विनाकारण रस्त्यावर पायी किंवा दुचाकीवर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, दंड वसूल करावा.
- महापालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी इ. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या दुकाने चालू ठेवण्याचे नियमांचे उदा. पी-१, पी-२ प्रमाणे दुकाने उघडी न ठेवता सर्व दिवशी दुकाने उघडी ठेवल्याचे आढळल्यास, अशा दुकानांची परवानगी रद्द करणे
- सामाजिक अंतर ठेवता दुकानामध्ये गर्दी करुन ग्राहक येत असतील तर दुकानदार तसेच ग्राहकांवर कारवाई करणे, तसेच हॉटेलमध्ये पार्सलची सुविधा उपलब्ध असूनही विनाकारण लोकांनी गर्दी केल्यास लोकांवर तसेच हॉटेल मालकांवर कारवाई करावी.
- लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम यात मर्यादेपेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास, सामाजिक अंतराचे पालन न केल्यास, संसर्ग वाढण्यास जबाबदार ठरत असतील तर मंगल कार्यालय मालकावर कारवाई करावी. गरजेनुसार अशा कार्यालयांची परवानगी रद्द करावी
- सार्वजनिक ठिकाणी, खासगी कार्यालयांमध्ये मास्क न वापरता संचार केल्यास कारवाई करावी. तसेच नियमांनुसार विहीत केलेला दंड वसूल करावा.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोनापाठोपाठ आणखी एका विषाणूचा मानवाला धोका; चीनने केला अलर्ट जारी
Exclusive: १७ रुपयांच्या मास्कची खरेदी २०० रुपयांना; आरोग्य विभागाकडून वारेमाप लूट
हवेच्या माध्यमातून पसरतोय कोरोना?; २३९ वैज्ञानिकांचा मोठा दावा, WHO ला पाठवलं पत्र
…तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय?; शिवसेनेचा भाजपा सरकारवर हल्लाबोल
कामगारांना वाऱ्यावर सोडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उद्योजकांना आवाहन