लॉकडाऊन : पाणी मिळत नसल्याने बेघरांचे अतोनात हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:21 PM2020-04-15T18:21:18+5:302020-04-15T18:22:24+5:30
बेघरांना जेवणासाठी वणवण करावी लागत होती. आणि आता पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.
मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. मात्र या लॉकडाऊनच्या कालावधीत बेघरांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यापूर्वी बेघरांना जेवणासाठी वणवण करावी लागत होती. आणि आता पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. परिणामी बेघरांसाठी मुंबई महापालिकेने पाण्यासाठी काही तरी करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोरोनाला थोपविले जात असतानाच आता हातावर पोट असणारे आणि रोज मोल मजुरी करणारे श्रमिक तसेच बेघर यांना अतोनात याचा फटका बसतोच आहे. हाताला काम नसल्याने अनेकांची उपासमार सुरु झाली आहे. कोरोनाच्या संकट समयी शिवभोजन योजना, कम्युनिटी किचन, तात्पुरते निवारे याची सोय करून श्रमिकांना, गोरगरिब मजुरांसाठी, बेघरांसाठी धीर देण्याचा प्रयत्न करून या योजना चालवित आहे. मात्र मुंबई शहरातील बेघर आणि पदपथावरील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्याचे मुंबई महापालिकेने नाकारले आहे. पूर्वी हे बेघर पिण्याचे पाणी हॉटेलवाल्याकडुन, शेजारील इमारतीमधून ,चाळीमधून घेत होते. यासाठी त्यांना विनंती करावी लागत होती. तेव्हा कुठे पाणी मिळत होते. मात्र आता त्यांना लॉकडाऊनच्या काळात कोणीच पाणी देत नाही. शिवाय संसर्गाच्या भीतीने बेघरांना कोणी जवळदेखील उभे करत नाही. आज शहरातील उघड्यावर वास्तव्य करणारे बेघर आणि पदपथवासी यांना दोन वेळचे जेवण मुंबई महापालिका सरकार तसेच स्वयंसेवी संस्था आणि दानशुर व्यक्तिच्या दातृत्वातून मिळत आहे. मात्र पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण अधिक वाढलेली आहे. पाण्याची तहान शमविण्यासाठी व कोणीच पाण्यासाठी उभे करीत नसल्याने अशा नागरिकांनी काय करावे? मुंबई महापलिकेची जलवाहिनी फोडण्याची सरकार वाट पहातेय काय? असा प्रश्न सीपीडी संस्थेचे आणि होमलेस कलेक्टिव्हचे सदस्य जगदीश पाटणकर यांनी केला आहे.
दरम्यान, जनता जागृती मंच,जोगेश्वरी येथील कार्यकर्ते नितीन कुबल यांनी के पूर्व जल कामे विभागाशी सातत्याने संपर्क व पाठपुरावा करून जोगेश्वरी सुभाष नगर येथील बेघर नागरिकांचे होणारी पाण्याची वणवण थांबविण्यासाठी के पूर्व जलकामे विभागाकडे मागणी आणि पाठपुरावा सुरु केला. मात्र यात नेहमी प्रमाणे सरकारी अनास्था दिसून येत होती. संघटनेच्या मानव अधिकार मागणी अंतर्गत १८० बेघरांसाठी तात्पुरते नळ कनेक्शन जोडून देण्यात आले आहे. मात्र मुंबईतील अशा बेघरांच्या राहण्याच्या ठिकाणी आणि जिथे गरज आहे त्या सर्वच ठिकाणी तात्पुरते नळ कनेक्शन जोडण्याची मागणी जनता जागृती मंच करीत असल्याचे नितीन कुबल यांनी सांगितले.