Join us

राज्यात लॉकडाऊन अटळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:06 AM

कठोर निर्बंधांचा फायदा होत नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे मतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हळूहळू गोष्टी बंद करण्याचा, काही भागांत कठोर ...

कठोर निर्बंधांचा फायदा होत नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हळूहळू गोष्टी बंद करण्याचा, काही भागांत कठोर निर्बंध लादून कोरोनाची साथ रोखण्याचा प्रयत्न सरकारने केला. मात्र, लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी राज्यात एकदम बंद करून हळूहळू गोष्टी सुरू केल्यास त्याचा फायदा होतो, हा माझा अनुभव असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संपादकांसोबतच्या बैठकीत केले. त्यामुळे राज्यात संपूर्ण लॉकडाऊन अटळ असल्याचे मानले जाते. त्याची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या ऑनलाइन बैठकीला प्रसारमाध्यमांचे संपादक, मालक, वितरक यांच्यासमवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण पाहता राज्यात कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मत आरोग्यमंत्र्यांनी मांडले.

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, एक-दोन दिवसांत कडक निर्बंध लागू करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. लॉकडाऊन हा उपाय नाही, पण दृश्य स्वरूपात बदल दिसले नाहीत आणि काही वेगळा उपाय मिळाला नाही, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आरोग्य सुविधा वाढविणे म्हणजे फर्निचरचे दुकान नाही. सुविधा वाढविल्या, तरी डॉक्टर आणि नर्सेस कुठून आणणार? सल्ला देणारे त्याचा पुरवठा करणार आहेत का, असा थेट प्रश्न त्यांनी केला होता.

या फेसबुक लाइव्हमध्ये म्हटल्याप्रमाणे, उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विविध क्षेत्रांतील मान्यवर, तज्ज्ञांशी चर्चा केली. राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाऊन अटळ असल्याचे स्पष्ट संकेत दिले. अन्य राज्यांमध्ये काय सुरू आहे, यावर मी बोलणार नाही. मला महाराष्ट्रातील जनतेचा जीव मोलाचा आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट सांगितले. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखही उपस्थित होते. बैठकीत संपादकांनीही कोरोना साखळी तोडण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. राज्य सरकार कुठलेही आकडे लपवत नाही. सर्व खरी माहिती दिली जात आहे, माध्यमांनीही जनजागृती करून कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक आहे, असे आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी संसर्ग रोखण्यासाठी इतर काही पर्याय आहेत का, ते सर्वांकडून जाणून घेतले आणि सूचना स्वीकारल्या.

कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही, पण जीव मोलाचा आहे. विषाणूच्या नव्या स्वरूपामुळे नवे आव्हान उभे आहे. लॉकडाऊनचा निर्णय सरकारलाही आवडणारा नाही, पण आता ही लढाई एकट्या सरकारची नाही. सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकारच्या असलेल्या प्रयत्नांना साथ देण्याचे आवाहन केले. याचे कुणी राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ डॉक्टरांची घेणार मदत

सध्या ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवले असले तरी सर्व उत्पादन वैद्यकीय कारणांसाठी कसे राखून ठेवता येईल, खासगी डॉक्टर, करार स्वरूपाने डॉक्टरांच्या सेवा कशा उपयोगात आणता येतील, त्याचा विचार सुरू आहे. ज्येष्ठ डॉक्टर, नर्स यांच्या सेवा घेणे, ई आयसीयूचा उपयोग करणे असे अनेक पर्याय चाचपून पाहिले जात आहेत, असा तपशील मुख्यमंत्र्यांनी दिला.

* या उपायांवर चर्चा

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीचे उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर, टेलीमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर साथ नियंत्रणाला प्राधान्य, दुकानदार- विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना वस्तू विक्रीची परवानगी, कोविड केंद्रांसंदर्भातील धास्ती कमी करणे, वारंवार जनतेशी संवाद अशा उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली.