लॉकडाऊन : लॅमिंग्टन रोड बंद; लॅपटॉपसह स्मार्ट फोन, संगणकांची दुरुस्ती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:06 AM2021-04-22T04:06:54+5:302021-04-22T04:06:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दक्षिण मुंबईतील इलेक्ट्रिक उपकरणांसह तंत्रज्ञानाशी निगडीत असलेली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे लॅमिंग्टन रोड परिसरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण मुंबईतील इलेक्ट्रिक उपकरणांसह तंत्रज्ञानाशी निगडीत असलेली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे लॅमिंग्टन रोड परिसरातील सर्व दुकाने कोरोना आणि कठोर निर्बंधांच्या कारणास्तव गेल्या पंधराएक दिवसांपासून बंद आहे. परिणामी बिघडलेल्या लॅपटॉपसह स्मार्ट फोन आणि संगणकाच्या दुरुस्तीसाठी नव्याने उपकरणे मिळेनाशी झाली आहेत आणि मिळालीच तर त्या उपकरणांसाठी किंवा ती सेवा घेण्यासाठी ग्राहकांना तब्बल तिप्पट दराने पैसे मोजावे लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अडचणीच्या काळात एखाद्या ग्राहकाची तिप्पट पैसे मोजण्याची तयार असली तरीदेखील दुरुस्तीसाठीच्या उपकरणांचा अभाव, बंद असलेली दुकाने आणि उपलब्ध नसलेले कारागीर अशा अनंत अडचणींमुळे विद्युत उपकरणांची दुरुस्ती रखडली आहे.
कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होमवर जोर देण्यात आला. याचवेळी शाळा आणि महाविद्यालयेदेखील घरूनच सुरू झाली. या काळात मोठ्या प्रमाणावर लॅपटॉप, संगणक आणि स्मार्ट फोनचा वापर वाढला. २४ तास या उपकरणांवर ताण येऊ लागल्याने ही उपकरणे देखील नादुरुस्त होऊ लागली. लॅपटॉपचा की बोर्ड चालेनासा झाला. मोबाईलची चार्जिंग पिन बंद झाली. मोबाईल खाली पडून स्क्रीन फुटली. अचानक मोबाईल काम करनेसा झाला. स्मार्ट फोनचा की बोर्ड चालेनासा झाला. व्हायरमुळे लॅपटॉप मान टाकू लागला, तर कुठे चार्जर खराब झाला. लॅपटॉपला चार्ज करणारी वायर नादुरुस्त झाली. संगणकाचा की बोर्ड चालेनासा झाला. याच्याशी संबंधित उपकरणेदेखील इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानात मिळेनाशी झाली. कारण त्याचा साठा संपला होता आणि होलसेल मार्केट बंद असल्याने पुरवठा कमी झाला होता. याचा परिणाम कामावर होऊ लागला. बरे एवढे सगळे नीट चालत् असतानाच कुठे तरी खंडित होणारा वीज पुरवठा मनस्ताप वाढवू लागला. अशा अनेक अडचणींना मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे.
लॉकडाऊन काळात, नंतर आणि आतादेखील स्मार्ट फोन दुरुस्त करणाऱ्या दुकानांबाहेर रांगा लागू लागल्या. दुरुस्तीसाठी दिलेला स्मार्ट फोन २४ तास उलटले तरी मिळेनासा झाला. अर्जंट बेसवर दुप्पट रक्कम देण्याची तयारी असली तरी ही दुरुस्ती करणारा कारागीर मिळेनासा झाला. अशा अनेक कारणांमुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त राहिली किंवा आहेत त्या परिस्थितीत काहींनी दम काढत काढत त्यावर काम केले आहे, करत आहेत. आजही दक्षिण मुंबईतील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेला लॅमिंग्टन रोड परिसर बंद असल्याने विद्युत उपकरणांना बसत असलेला शॉक कायम आहे.
------------
लॅपटॉप, संगणक किंवा स्मार्ट फोनशी निगडीत ज्या बाजारपेठा आहेत, त्या बहुतांश बाजारपेठा गेल्या १५ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे विद्युत उपकरणांशी निगडीत साहित्य मिळेनासे झाले आहेत. जिथे हे साहित्य उपलब्ध आहे किंवा जेथून हे साहित्य मिळत आहे तिथे त्या साहित्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट किंमत मोजावी लागत आहे किंवा साहित्य मिळेनासे झाले आहे. परिणामी विद्युत उपकरणांची दुरुस्ती रखडली आहे. शिवाय लॅमिंग्टन रोडवरील बाजारपेठेचे नुकसान होत आहे ते वेगळेच. येथे ३०० ते ४०० दुकाने आहेत. ही सगळी बंद आहेत. यांचे मोठे नुकसान झाले असून, येथील छोटया मोठया दुकानदारांना सरकारने मदत करणे अपेक्षित आहे.
- विक्रम कांबळे, जाणकार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र