राज्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. लोकांच्या मनात पूर्वीप्रमाणे भीती राहिली नाही. घरातील एक रुग्ण कोरोनाबाधित झाला तर तो पूर्ण कुटुंबाला बाधित करत आहे. पुण्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा लॉकडाऊनला विरोध आहे. आम्हाला लॉकडाऊन करून समाधान मिळत नाही. असे त्यांनी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाची बैठक झाली.
लॉकडाऊन केला नाही तरी कठोर निर्बंध लागू होतील. असे संकेत मंत्रीमंडळाकडून देण्यात आले होते. त्यानुसार राज्यात कडक निर्बंधाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, आताच्या कोरोनाबाधित रुग्णाला आधीसारखा त्रास जाणवत नाहीये. खासगी आणि सरकारी रुग्णालयात बेड कमी पडू न देण्याची काळजी घेत आहोत. ऑक्सिजनचीही कमतरता भासणार नाही. याकडे आमचे लक्ष आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून १५ एप्रिलपर्यंतच्या परिस्थितीचे निरीक्षण केले जाईल.
लॉकडाऊन लावायचा असेल तर दोन दिवस अगोदर सांगितले जाईल. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कठोर निर्बंध करण्याचे निर्णय घेण्याअगोदर मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे यामध्ये कोणीही राजकारण आणू नये अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली आहे.